पत्रकार राणा अयुबकडून १ कोटी ७७ लाख जप्त; ईडीकडून विशेष न्यायालयात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 06:01 AM2022-10-14T06:01:06+5:302022-10-14T06:01:17+5:30

ज्या कारणांसाठी हा पैसा गोळा करण्यात आला होता त्यातील केवळ २९ लाख रुपयेच त्या कामासाठी वापरल्याचे स्पष्ट झाले, तर बाकीच्या पैशांसाठी तिने बनावट बिले सादर केल्याचाही ठपका ईडीने ठेवला आहे.

1 crore 77 lakh seized from journalist Rana Ayub; Complaint by ED to Special Court | पत्रकार राणा अयुबकडून १ कोटी ७७ लाख जप्त; ईडीकडून विशेष न्यायालयात तक्रार

पत्रकार राणा अयुबकडून १ कोटी ७७ लाख जप्त; ईडीकडून विशेष न्यायालयात तक्रार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लोकहिताचे प्रकल्प साकारायचे असल्याचे भासवत सर्वसामान्य लोकांकडून पैसे गोळा करून ते पैसे वैयक्तिक बँक खात्यात वळविल्याचा ठपका ठेवत पत्रकार राणा अयुब हिच्याविरोधात ईडीने विशेष न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. तसेच, आतापर्यंत राणाच्या बँक खात्यातील १ कोटी ७७ लाख रुपयांची रक्कमदेखील ईडीने जप्त केली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार, सन २०२० मध्ये राणाने कोविड काळात महाराष्ट्र, आसाम, बिहार येथे झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना मदत करणे, तसेच अन्य काही समाजहिताची कारणे दाखवत केट्टो या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे सर्वसामान्य माणसांकडून मोठ्या प्रमाणावर पैसा गोळा केला होता. या कामासाठी तिला लोकांकडून २ कोटी ६९ लाख रुपये मिळाल्याचे ईडीच्या तपासांत दिसून आले. हे पैसे तिच्या वडिलांच्या, तसेच बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा झाले होते. त्यानंतर हे पैसे त्या दोघांच्या खात्यातून राणाच्या खात्यामध्ये वळविल्याचे तपासात आढळले. तिच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर या पैशांतील ५० लाख रुपयांची रक्कम तिने मुदत ठेवींमध्ये गुंतविली, तर आणखी ५० लाख रुपये तिच्याच दुसऱ्या बँक खात्यामध्ये वळविले. ज्या कारणांसाठी हा पैसा गोळा करण्यात आला होता त्यातील केवळ २९ लाख रुपयेच त्या कामासाठी वापरल्याचे स्पष्ट झाले, तर बाकीच्या पैशांसाठी तिने बनावट बिले सादर केल्याचाही ठपका ईडीने ठेवला आहे. या प्रकरणी गाझियाबाद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. मात्र, यातील आर्थिक व्याप्ती लक्षात घेता ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. ४ एप्रिल २०२२ रोजी राणा अयुब हिच्या बँक खात्यातील सर्व रक्कम जप्त केली. 

परदेशातूनही देणग्या
राणा अयुबने परदेशातूनही काही देणग्या स्वीकारल्याचे ईडीच्या तपासांत निष्पन्न झाले. मात्र, परदेशातून स्वीकारण्यात आलेल्या देणग्यांसाठी तिने सरकारची कोणतीही आवश्यक परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे परदेशी चलन विनिमय कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोपही ईडीने आपल्या तक्रारीमध्ये केला आहे.

Web Title: 1 crore 77 lakh seized from journalist Rana Ayub; Complaint by ED to Special Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.