अडीच कोटींच्या बिलासाठी अभियंत्याला १ कोटींची लाच, एमआयडीसीच्या सहायक अभियंत्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 05:28 AM2023-11-05T05:28:24+5:302023-11-05T05:28:35+5:30
अमित किशोर गायकवाड असे या अभियंत्याचे नाव आहे. या प्रकरणी नागापूर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
अहमदनगर : कंत्राटदाराचे अडीच कोटींचे बिल काढण्यासाठी चक्क एक कोटीची लाच घेताना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अहमदनगर येथील सहायक अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकाने शुक्रवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले.
अमित किशोर गायकवाड असे या अभियंत्याचे नाव आहे. या प्रकरणी नागापूर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून न्यायालयाने गायकवाडला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्याचा सहकारी गणेश वाघ फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे एसीबीचे महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.
असे घेतले ताब्यात...
लाचेची रक्कम शेंडी बायपास परिसरात घेण्याचे ठरले होते. त्यानुसार गायकवाड हा वाहनातून तिथे आला.
त्याने लाच स्वीकारली व तेथूनच वाघ याला फोन करून साहेब पाकीट मिळाले आहे, तुमच्या हिश्श्याची रक्कम कुठे पाठवू, असे बोलणे सुरू असतानाच त्याला ताब्यात घेतले.