१ कोटीची नामांकित कंपनीची बनावट घड्याळे जप्त; ३ आरोपी अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 08:30 PM2019-09-25T20:30:05+5:302019-09-25T20:31:41+5:30
या प्रकरणी ३ आरोपींना अटकही करण्यात आली.
मुंबई - रॅडो, रोलेक्स, केल्विन क्लेन, स्विस, फास्ट ट्रॅक, फॉसिल, रोलेक्स, डिझेल आदी नामांकित कंपन्यांची १ कोटी ५ लाख ६२ हजार रुपये किंमतीची बनावट घड्याळं मुंबईपोलिसांनी जप्त केली आहेत. १७ सप्टेंबरला गुन्हे प्रकटीकरण शाखेने नामांकित कंपन्यांची बनावट घड्याळं, घड्याळांचे स्पेअर पार्ट, साहित्य अशी एकूण २० लाख ९७ हजार, ४५० किंमतीची मालमत्ता जप्त केली होती. या प्रकरणी ३ आरोपींना अटकही करण्यात आली.
अटक आरोपींच्या चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार बनावट घड्याळे ज्या व्यक्तीला पुरवण्यात येते त्याबाबत मिळालेल्या अधिक माहितीआधारे सारंग स्ट्रीट, पायधुनी, मुंबई येथील ऑफिसमध्ये छापा टाकला आणि केल्विन क्लेन, फास्ट ट्रॅक, फॉसिल, रोलेक्स, राडो आदी नामांकित कंपन्यांची ५ हजार २८१ घड्याळं जप्त केली. तसेच या प्रकरणी ऑफिस मालकालाही अटक करण्यात आली आहे. त्याची कसून चौकशी सुरु आहे असे देखील पोलिसांनी सांगितले. तपासादरम्यान असं निष्पन्न झालं आहे की ही घड्याळं बनावट आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरात करुन मुंबई, महाराष्ट्र आणि इतर राज्यात ती विकली जातात. ही कुठून प्राप्त केली जातात अथवा आयात केली जातात? या सगळ्याची माहिती काढण्याचे काम सुरु आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त भोपळे, प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक खोत पोलीस निरीक्षक नितीन पाटील, मोहसीन पठाण यांनी ही कारवाई केली आहे.