१ कोटींची सुपारी, ISI शी लिंक अन् तरुणाची हत्या... तेलंगणातील 'हॉरर' ऑनर किलिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 08:30 PM2018-09-18T20:30:45+5:302018-09-18T20:31:20+5:30
२३ वर्षीय प्रणय कुमारची हत्या करण्यासाठी या गँगला १ कोटी रुपयाची सुपारी देण्यात आली होती. याप्रकरणी मुख्य आरोपी सुभाष शर्मासह अन्य आरोपींना तेलंगणा पोलिसांना अटक केली आहे.
हैद्राबाद - तीन दिवसांपूर्वी तेलंगणमध्ये गर्भवती पत्नीसमोर पतीची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली होती. तेलंगणच्या नालगोंडा जिल्ह्यात रुग्णालयाबाहेर ही धक्कादायक हृदयद्रावक घटना घडली होती. पोलिसांना या गुन्ह्याची उकल करण्यात यश आले असून पोलिसांनी बिहारमधून मारेकऱ्यासह एकूण सात जणांना अटक केली आहे. २३ वर्षीय प्रणय कुमारची हत्या करण्यासाठी या गँगला १ कोटी रुपयाची सुपारी देण्यात आली होती. याप्रकरणी मुख्य आरोपी सुभाष शर्मासह अन्य आरोपींना तेलंगणा पोलिसांना अटक केली आहे.
हत्या करणाऱ्या टोळीचे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISIशी संबंध असल्याचीही माहिती समोर आली आहे. मारेकऱ्यांना सुपारीच्या रक्कमेपैकी १८ लाख रुपये मिळाले होते. मुख्य मारेकरी गुजरातमधील माजी मंत्री हरेन पांडया यांच्या हत्येमध्ये देखील सहभागी होता. शुक्रवारी प्रणय कुमार नालगोंडा जिल्ह्यातील रुग्णालयातून पत्नी अमृतासोबत बाहेर पडला. त्यावेळी मारेकरी तिथे आला व त्याने धारदार शस्त्राने वार करुन प्रणयची हत्या केली. अमृताने पोलिसांना दिलेल्या जबाबात तिचे वडिल मारुती राव आणि काका श्रवण राव यांच्यावर संशय व्यक्त केला होता. अमृताच्या कुटुंबाचा या आंतरजातीय लग्नाला विरोध होता. मारुती राव रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठे व्यावसायिक आहेत. श्रीमंत-प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होतो. अमृताने कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रणयशी लग्न केले होते. माझ्या कुटुंबाकडून धोका असल्यामुळे काही काळ आम्ही लपूनही राहिलो होतो. पण अशा प्रकारे हत्या करतील अशी अपेक्षा केली नव्हती असे अमृताने सांगितले. प्रणय आणि अमृताने ३० जानेवारी २०१८ ला लग्न केले होते.