खळबळजनक! १ किलोचा अर्थ १ लाख, कोडवर्डद्वारे मागितली लाच; ED च्या २ अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 02:05 PM2021-07-03T14:05:41+5:302021-07-03T14:08:23+5:30
पूर्ण काम सिंह आणि भुवनेश कुमार यांनी कंपनी मालकाला आणि त्याच्या मुलाला २२ आणि २५ मे रोजी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात बोलावलं होतं.
नवी दिल्ली – सध्या देशात आणि राज्यात ईडी विभागाची बरीच दहशत आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांचा छापा पडणार म्हटल्यावर भलेभले गारद होतात. महाराष्ट्रात तर अनेक बड्या नेत्यांना ईडीच्या कारवाईची झळ बसली आहे. ईडी आणि सीबीआय हे केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करतात असा आरोप अनेकदा केला जातो. परंतु ईडीच्या कारवाईमुळे अनेकांची बोलती बंद होते.
याच ईडीचा दबदबा असणाऱ्या अधिकाऱ्यांना सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी पकडलं आहे. केंद्रीय अन्वेषण ब्यूरोनं १०४ कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी गुजरातमधील एका कंपनीच्या मालकांकडून ७५ लाखांची लाच मागितल्या आरोपाखाली ईडीच्या २ अधिकाऱ्यांना अटक केली आहे. ईडीचे उपसंचालक आणि सहाय्यक संचालक यांना लाच घेताना पकडलं आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, २०१३ च्या बॅचमधील आयआरएस अधिकारी उपसंचालक पूर्ण काम सिंह आणि सहाय्यक संचालक भुवनेश कुमार या दोन अधिकाऱ्यांना त्यांच्या मध्यस्थीच्या माध्यमातून लाचेतील काही रक्कम घेताना अटक केली आहे.
सिंह आणि कुमार हे दोन्ही अधिकारी ईडीच्या अहमदाबाद शाखेत काम करतात. सीबीआयनं(CBI) या दोन्ही अधिकाऱ्यांच्या अहमदाबाद येथील कार्यालय आणि अन्य ठिकाणांवर धाड टाकली. प्राथमिक माहितीनुसार अरंडी तेल आणि स्टील पाईप उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या मालकाला १०४ कोटींच्या बँकेच्या कथित कर्ज घोटाळ्याचा आरोप आहे. सीबीआय आणि ईडी या प्रकरणाचा तपास करत होते.
पूर्ण काम सिंह आणि भुवनेश कुमार यांनी कंपनी मालकाला आणि त्याच्या मुलाला २२ आणि २५ मे रोजी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात बोलावलं होतं. १८ जून रोजी पिता-पुत्र ईडीच्या कार्यालयात गेले तेव्हा सिंह यांनी या दोघांना मारहाण केली आणि संपत्ती जप्त करण्याची धमकी दिली. अधिकाऱ्याने कोड वर्डच्या माध्यमातून या दोघांकडे लाच मागितल्याची चर्चा आहे. या दोघांना मारहाण करून सांगण्यात आलं होतं की, काही रक्कम देताना तुम्हाला कोडवर्डचा वापर करावा लागेल. १ किलोचा अर्थ १ लाख म्हणजे जर व्यापाऱ्याला १० लाख रुपये द्यायचे आहेत तर ईडीच्या अधिकाऱ्यांना म्हटलं जातं की, १० किलो माल आला आहे.