उल्हासनगरात १ लाख ४५ हजाराची ऑनलाईन फसवणूक
By सदानंद नाईक | Published: June 5, 2023 07:44 PM2023-06-05T19:44:49+5:302023-06-05T19:45:01+5:30
मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सदानंद नाईक, उल्हासनगर: आयुष्य हॉस्पिटल व रेडक्रॉस हॉस्पिटल मध्ये ऑनलाईन अपॉइंटमेंट घेण्यासाठी सुहाना कुकरेंजा व शिवानी तिवारी यांनी व्हाट्सअप कॉलवर केल्यावर त्यांची १ लाख ४५ हजाराची ऑनलाईन फसवणूक झाली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३ मध्ये राहणाऱ्या सुहाना कुकरेजा ह्या फॅशन डिझाइनर आहेत. त्यांच्या मास्टरला चेकअप करण्यासाठी त्यांनी आयुष्य हॉस्पिटलला गुगलद्वारे फोन केला. एकाने हॉस्पिटलचा कर्मचारी सांगत मोबाईल व्हाट्सअप लिंक पाठवून भरण्यास सांगितली. तेव्हा त्यांची १ लाखाची फसवणूक झाली. हा प्रकार ३१ मे रोजी घडला. तर सुहाना हिची मैत्रीण शिवानी तिवारी हिनेही रेडक्रॉस हॉस्पिटलला गुगलद्वारे फोन केला. तेव्हा हॉस्पिटलचा कर्मचारी असल्याचे एकाने बतावणी करून मोबाईलवर व्हाट्सअप लिंक पाठविली. ती भरून दिली असता तिची ४५ हजाराने फसवणूक झाली. दोघीने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केल्यावर, पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अधिक तपास मध्यवर्ती पोलीस करीत आहेत.