1 व्यक्ती अन् 3 पोलीस स्टेशन; मनसुख हिरण मृत्यू प्रकरणाचा तपास ATSकडे

By पूनम अपराज | Published: March 5, 2021 10:22 PM2021-03-05T22:22:50+5:302021-03-05T22:23:28+5:30

Mansukh Hiran death case : दुदैवाने आज मनसुख यांच्या मृत्यूची बातमी पसरली आणि तात्कळ गृहमंत्रांनी या मृत्यूप्रकरणी एटीएसकडे सोपवला. 

1 person and 4 police stations; Mansukh Hiran death case investigated by ATS | 1 व्यक्ती अन् 3 पोलीस स्टेशन; मनसुख हिरण मृत्यू प्रकरणाचा तपास ATSकडे

1 व्यक्ती अन् 3 पोलीस स्टेशन; मनसुख हिरण मृत्यू प्रकरणाचा तपास ATSकडे

Next
ठळक मुद्देठाण्यातील वंदना सिनेमासमोर असलेले मनसुख हिरण यांचे कारच्या सुट्या भागाच्या सामान विक्रीचे क्लासिक कार डेकोर हे दुकान शुक्रवारी दिवसभर असे बंद होते.

प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलीया निवासस्थानासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत आज आढळून आल्याने एकच खळबळ माजली. या मृत्यूनंतर अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. मात्र, मनसुख हे १८ फेब्रुवारीला स्कॉर्पिओ हरवल्याची तक्रार विक्रोळी पोलीस ठाण्यात करतात ते मनसुख यांच्या मृत्यूप्रकरणी तपास एटीएस करणारपर्यंतच्या सर्व घटनाक्रमात ३ पोलीस स्टेशनपर्यंत मनसुख यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध आला. मात्र, दुदैवाने आज मनसुख यांच्या मृत्यूची बातमी पसरली आणि तात्कळ गृहमंत्रांनी या मृत्यूप्रकरणी एटीएसकडे सोपवला. 

 

Mukesh Ambani bomb scare : माझे पती आत्महत्या करूच शकत नाही; मृत्यूची सखोल चौकशी व्हावी

 

मनसुख यांची कार लॉकडाऊनमुळे बरेच दिवस बंद होती. दरम्यान, १७ फेब्रुवारी रोजी ऑपेरा हाउस येथे काम असल्याने त्यांनी कार दुरुस्त करून घेतली. दुपारच्या सुमारास ऐरोली ब्रिजपर्यंत पोहोचताच कारचे स्टेअरिंग जाम झाल्यामुळे तेथीलच सर्विस रोडवर ती पार्क करून मनसुख पुढे निघून गेले. १८ फेब्रुवारी रोजी कार पार्क केलेल्या ठिकाणी गेल्यावर कार तेथे नसल्याने विक्रोळी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती. चोरट्यांनी स्कॉर्पिओची ओळख पटू नये म्हणून कारचा चेसिस आणि इंजीन क्रमांक घासला होता आणि प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलीया या निवासस्थानाबाहेर जिलेटीनच्या कांड्यासह धमकी पत्र या हरवलेल्या स्कॉर्पिओमध्ये ठेवल्याचे आढळून आले. काचेवरील क्रमांकामुळे कारची ओळख पटली. तपासात ती चोरी झाल्याचे समजताच पोलिसांनी कार मालकाला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी सुरू केली होती. मनसुख यांनी वेळोवेळी पोलिसांना सहकार्य केले. अंबानींच्या निवासस्थानाबाहेर साडपलेल्या कार प्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  

त्यानंतर काल कांदिवली गुन्हे शाखेतून एका तावडे नावाच्या व्यक्तीचा काल हिरण यांना कॉल आला. त्याने घोडबंदर येथे भेटायला बोलावले आणि त्यानंतर हिरण गेले ते परत घरी आलेच नाही. हिरण यांचा मोबाईल देखील रात्री १० नंतर लागत नव्हता अशी माहिती त्यांच्या पत्नीने दिली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत मिसिंग तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात दिली. आज सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास मुंब्रा रेतीबंदर खाडीत हिरण यांचा मृतदेह आढळल्याने मुंब्रा पोलीस ठाण्यात याबाबत अपमृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आला.  

ठाण्यातील वंदना सिनेमासमोर असलेले मनसुख हिरण यांचे कारच्या सुट्या भागाच्या सामान विक्रीचे क्लासिक कार डेकोर हे दुकान शुक्रवारी दिवसभर असे बंद होते. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच या दुकानाच्या बाजूची सर्व दुकानेही बंद ठेवण्यात आली होती. आज अधिवेशनात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या कारबाबत NIA तपास करण्याची मागणी केली होती आणि त्याचदरम्यान हिरण यांच्या मृत्यूची बातमी समोर आली. अखेर स्फोटके असलेल्या कारप्रकरणी  आणि मनसुख हिरण मृत्यूप्रकरणी एटीएस तपास करणार असल्याची महत्वपूर्ण माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. आता मनसुख यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी एटीएसच्या हाती काय धागेदोरे लागतात याकडे सर्वाचं लक्ष आहे. 

Web Title: 1 person and 4 police stations; Mansukh Hiran death case investigated by ATS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.