मोबाईल नंबर मागत, माझ्यासोबत बोलत जा म्हणणाऱ्या युवकास १ वर्षाची शिक्षा
By नितिन गव्हाळे | Published: March 1, 2023 01:56 PM2023-03-01T13:56:38+5:302023-03-01T13:56:56+5:30
आरोपी युवकास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा
नितीन गव्हाळे
अकोला : मुलीचा हात पकडून ‘तुझा मोबाइल नंबर दे आणि माझ्या सोबत बोलत जा, नाहीतर तुझे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकील,’ अशी धमकी मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपी युवकास प्रथम श्रेणी जिल्हा व सत्र न्यायाधीश शयना पाटील यांच्या न्यायालयाने मंगळवारी एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व दंड ठोठावला आहे.
वाशिम बायपास परिसरात असलेल्या सिद्धार्थवाडी येथील सचिन शालीकराम वाघमारे (२२) हा नेहमीच अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला हातवारे करत होता व सतत त्रास देत होता. ३१ जानेवारी २०१७ रोजी त्याने मुलीचा हात पकडून तिला मोबाइल नंबर मागत, माझ्यासोबत बोलत जात, असे म्हणत विनयभंग केला. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी आरोपी सचिन वाघमारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक स्वाती मधुकर इथापे यांनी तपास करून आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात सरकार पक्षाने नऊ साक्षीदार तपासले. साक्ष, पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ञ राजेश अकोटकर यांनी बाजू मांडली. पैरवी अधिकारी एएसआय फजलू रहमान काझी, वैशाली कुंबलवार यांनी सहकार्य केले.
अशी ठोठावली शिक्षा
विनयभंग करणाऱ्या सचिन वाघमारेला न्यायालयाने दोषी ठरवून भा.दं.वि कलम ३५४ अंतर्गत एक वर्ष सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड, ३५४-ड सह कलम १२ पोक्सो ॲक्टअंतर्गत एक वर्ष सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली व दंड न भरल्यास ३० दिवस साधी कैद भोगावी लागणार आहे. याशिवाय कलम ५०६ अंतर्गत दोषी ठरवून सहा महिने सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैदेची शिक्षा सुनावली. सर्व शिक्षा आरोपीला सोबतच भोगावयाच्या आहेत. दंडाच्या रकमेतून पीडितेला नुकसानभरपाई म्हणून दिली जाणार आहे.