बकरी चोरांनी बांधला १० कोटींचा बंगला; संपत्ती पाहून पोलीसही चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 08:38 PM2023-08-19T20:38:31+5:302023-08-19T20:39:41+5:30
आरोपींनी दोन महिन्यांच्या अंतराने प्रवाशांना आपल्या ऑटो रिक्षात बसवून त्यांच्याकडून ७ लाख रुपये लुटले
बिहारची राजधानी पाटणा येथील कोतवाली पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या तपासात आश्चर्यकारक माहिती समोर आली. त्यामुळे, पोलीसही अचंबित झाले असून अधिक तपास करण्यात येत आहे. नट खलिफा गटाच्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्यांनी केवळ बकऱ्या चोरून आणि पाकिटमारी करुन तब्बल १० कोटी रुपयांची इमारत उभारली आहे. त्यामुळे, पोलिसांना आश्चर्याचा धक्काच बसला.
आरोपींनी दोन महिन्यांच्या अंतराने प्रवाशांना आपल्या ऑटो रिक्षात बसवून त्यांच्याकडून ७ लाख रुपये लुटले. जवळपास १ डझन लोकांचे खिसे कापून आणि बॅगेतील सोनं गायब करण्यात आलंय. वीरु नट, संतोष खलिफा आणि अजय खलिफा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या आरोपींकडून एक रिक्षा, ५ लाख ६३ हजार रुपये रोख, सोने-चांदीचे दागिने, तीन मोबाईल आणि अवैधपणे जमा केलेल्या संपत्तीची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.
अटकेतील सर्वच आरोपी एकमेकांचे नातलग आहेत. चोरी हाच त्यांचा मूळ धंदा असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली, असे एसपी वैभव शर्मा यांनी सांगितले. या आरोपींच्या एकूण संपत्तीची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी मिळवत आहेत. या आरोपींचे प्रकरण आयकर विभाग आणि ईओयू म्हणजे आर्थिक गुन्हे विभागाकडे सोपविण्यात आला आहे.
आरोपी विरुने पोलिसांना सांगितले की, आमचा मूळ व्यवसाय हा बकरी चोरीचा आहे. दिवसभर गावं आणि घरांची रेकी करुन रात्री बकऱ्या चोरतो. त्यानंतर, या बकऱ्या पाटणाच्या चित्तकोहरा येथील बकरी बाजारात विकल्या जातात. विरु हा पायाने अपंग आहे, पण रिक्षा चालवण्यात परफेक्ट आहे. याच कौशल्यातून विरुसह त्याच्या नातलगांनी ऑटो रिक्षातील प्रवाशांना लुटायचा चोरीचा दुसरा धंदा सुरू केला होता.
विरुने बिहारमधील सोन्याच्या व्यापाऱ्यांचा बारकाईने अभ्यास केला होता. बाकरगंज येथे ही व्यापारी मंडळी येतात म्हणून त्याने तेथूनच रिक्षाचा धंदा करण्यास सुरुवात केली होती. संतोष आणि अजय यांच्या मदतीने रिक्षातील प्रवाशांना वाटेतच अडवून ते पैसे आणि दागिने लुटण्याचं काम करत. विशेष म्हणजे यासाठी दुसऱ्याच्या नावाने खेरदी केलेली रिक्षा ते वापरत होते.
दरम्यान, पोलिसांना या चोरट्यांकडून मोठी रक्कम व संपत्ती हस्तगत करण्यात येत आहे. यांच्या बंगल्याची बाजार भावानुसार किंमत अंदाजे १० कोटी एवढी असल्याचे समजते. हा बंगला ५ मजली उंच आणि अलिशान आहे.