व्यवसायिकाचे अपहरण करुन जीवे मारण्याची धमकी, गजा मारणेसह १० जणांवर गुन्हा दाखल

By विवेक भुसे | Published: October 9, 2022 10:38 AM2022-10-09T10:38:53+5:302022-10-09T10:45:06+5:30

या प्रकरणी नांदेड सिटीमध्ये राहणार्‍या एका ३३ वर्षाच्या व्यावसायिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

10 people were arrested for kidnapping a businessman and threatening to kill him | व्यवसायिकाचे अपहरण करुन जीवे मारण्याची धमकी, गजा मारणेसह १० जणांवर गुन्हा दाखल

व्यवसायिकाचे अपहरण करुन जीवे मारण्याची धमकी, गजा मारणेसह १० जणांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

पुणे : शेअर टेडिंगच्या व्यवसायात गुंतविलेल्या ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटी रुपयांची मागणी करुन व्यावसायिकाचे अपहरण करुन त्याला व त्यांच्या कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कुख्यात गुंड गज्या मारणे याच्यासह १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
तापोळा तुरुंगातून सुटल्यानंतर गज्या मारणे याने मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरुन मोठी रॅली काढली होती. याप्रकरणात पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड व पुणे शहर पोलिसांनी गज्या मारणे व त्यांच्या साथीदारांवर अनेक गुन्हे दाखल केले होते. ग्रामीण पोलिसांनी फसार झालेल्या गज्या मारणेला सातारा जिल्ह्यातून पकडून त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध केले होते. स्थानबद्धतेतून मार्च २०२२ मध्ये सुटल्यानंतर काही काळ तो शांत होता. आता त्यांच्यावर सुपारी घेऊन व्यावसायिकाचे अपहरण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी नांदेड सिटीमध्ये राहणार्‍या एका ३३ वर्षाच्या व्यावसायिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन गज्या मारणे, हेमंत पाटील, फिरोज तात्या, अमर किरदत्त, पप्पु घोलप, रुपेश मारणे, एक महिला व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार कात्रज येथील आय सी आय सी आय बँकेसमोर ७  ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजल्यापासून ८ ऑक्टोबरला दुपारी दीड वाजेपर्यंत घडला आहे. हेमंत पाटील, पप्पु घोलप, गज्या मारणे, रुपेश मारणे हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा पुणे व सांगली येथे रियल इस्टेट व शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. हेमंत पाटील यांनी शेअर ट्रेडिंगसाठी फिर्यादी यांना नोव्हेबर २०२१ मध्ये  ४ कोटी रुपये दिले होते. फेब्रुवारी २०२२ मध्ये फिर्यादी यांना शेअर ट्रेडिंगमध्ये तोटा झाला. त्यामुळे त्यांना हेमंत पाटील याचे ४ कोटी रुपये परत करणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्याने वारंवार पैशांची मागणी केली. तेव्हा फिर्यादी यांनी त्यांना गणपती पुळे येथील ४ कोटी रुपयांची जमीन देण्याची तयारी दर्शविली. त्यावेळी हेमंत पाटील याने २० कोटी रुपयांची मागणी केली. त्यानंतर ७ आॅक्टोबर रोजी फिर्यादी व त्यांचा मित्र हे कात्रज येथील आय सी आय सी आय बँकेतून बाहेर आले. त्यावेळी त्यांच्या गाडीजवळ चार जण थांबले होते. त्यांनी त्यांनी फिर्यादी यांना जबरदस्तीने गाडीत बसविले. त्यांच्यापैकी एकाने मी पप्पु घोलप आहे, आम्ही गज्या मारणेच्या गँगमधील आहोत. त्यानंतर हेमंत पाटील हा त्यांच्या गाडीत आला. त्यानंतर २० कोटी रुपयांची मागणी केली. तोपर्यंत गाडीतून फिर्यादी यांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरवत ठेवले होते.   तेव्हा पप्पु घोलप याने संतोष नावाच्या साथीदाराला फोन लावला व गज्या मारणेला फोन द्या असे सांगितले. त्यानंतर तो फिर्यादीला म्हणाला की, ‘‘मी महाराज बोलतोय, तुमचा जो काय विषय असेल तो मिटवून घ्या, नाही तर तुला संपवून टाकीन,’’ अशी धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी यांनी घाबरुन पैसे देण्यास होकार दिला. त्यानंतर फिरोज तात्या, अमर किरदत्त, हेमंत पाटील यांनी तुला पैसे महत्वाचे की जीव असे म्हणून हाताने मारहाण केली. त्यानंतर फियार्दी यांनी मित्रांना व भावाला फोन लावायला सांगितला. त्यांच्याशी बोलणे झाल्यावर रात्री १० वाजता रावेत येथील हॉटेल तोरणा येथे त्यांना नेण्यात आले. त्यांच्याबरोबर एक महिला होती. अमर किरदत्त याने ‘‘तु या ठिकाणी जेवण नीट कर व शांत रहा,’’ असे सांगितले. बरोबरच्या महिलेने ‘‘तु जर येथे काही वेड वाकडे केले तर तुझ्यावर मी बलात्काराचा गुन्हा दाखल करेल,’’ अशी धमकी दिली़ जेवण झाल्यावर त्यांना गाडीतून हायवेवर फिरवत राहिले. मध्यरात्री दीड वाजता त्यांचा मित्र चांदणी चौकात आला. त्याच्याशी बोलल्यानंतर फियार्दी यांना सोडून देण्यात आले व कोणाशी बोलल्यास, पोलिसांना माहिती दिली तर तुला व तुज्या घरांच्याना जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. पप्पु घोलप याने सकाळी १० वाजता त्याच्या  आॅफिसला बोलावले. त्यानंतर ते पप्पु घोलपच्या  आॅफिसवर गेले. त्यापूर्वीच फिर्यादीच्या भावाने पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. पोलीस त्यांचा शोध घेत होते. त्यानंतर पप्पु घोलप याने फिर्यादीला त्याच्या भावाच्या ताब्यात द्या, असे सांगितले. त्यानंतर दुपारी दीड वाजता एस जी एस मॉलजवळ त्यांनी फिर्यादीला त्यांच्या भावाच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस आयुक्तालयात जाऊन खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार केली. खंडणी विरोधी पथक अधिक तपास करीत आहेत.

Web Title: 10 people were arrested for kidnapping a businessman and threatening to kill him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.