लैंगिक अत्याचार करून विद्यार्थिनीला गरोदर करणाऱ्या शिक्षकाला १० वर्ष कारावास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 04:53 PM2019-07-09T16:53:43+5:302019-07-09T16:59:29+5:30
अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी.बहालकर यांनी ही शिक्षा सुनावली
ठाणे - बहुचर्चीत नवी मुंबई येथील नेरूळमधील महात्मा गांधी मिशन (एमजीएम) शाळेत सातवीच्या विद्यार्थीनीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार करत तिला गरोदर करणारा शिक्षक राज उर्फ हरिशंकर अवध बिहारी शुक्ला याला ठाणे जिल्हा न्यायालयाने आज 10 वर्ष कारावास आणि 50 हजार रुपये दंड अशी सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी.बहालकर यांनी ही शिक्षा सुनावली असून सरकारी वकील म्हणून वर्षा चंदने यांनी काम पाहिले.
नेरुळच्या महात्मा गांधी मिशन (एमजीएम) शाळेतील विद्यार्थिनीवर बलात्कार करणारा फरार शिक्षक हरिशंकर शुक्ला याला पोलिसांनी दिल्लीतून अटक केली होती. डिसेंबर २०१६ साली आरोपी हरिशंकर शुक्ला हा दिल्लीत असल्याचे त्याच्या मोबाइल ट्रेसिंगवरून निदर्शनास आले होते. नेरुळच्या सेक्टर-८ मध्ये असलेल्या एमजीएम शाळेत इंग्रजी माध्यमात सातवी इयत्तेत शिकणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थिनीवर या शाळेतील शिक्षक हरिशंकर शुक्ला याने बलात्कार केला. यातून ही मुलगी गर्भवती राहिली होती. मुलीच्या पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती. मात्र, मुख्याध्यापिका सविता गुलाटी यांनी कोणतीही दखल घेतली नाही. उलट मुलीच्या पालकांनाच दमदाटी केल्याचा आरोप पालकांनी केला होता. नेरुळ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. हरिशंकर शुक्ला हा सातवीच्या वर्गाला इंग्लिश शिकवत होता. एप्रिलमध्ये वर्गातील सर्व मुले पीटी तासासाठी वर्गाबाहेर गेले असताना या शिक्षकाने पीडित विद्यार्थिनीला एकटीला थांबवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर या शिक्षकाने पीडित विद्यार्थीनीला जिवे मारण्याची धमकी देऊन तिला गप्प राहण्यास सांगितले होते. घडलेला प्रकार मुलीने घरात न सांगितल्याने आरोपीने २०१६ साली ऑगस्टमध्ये पुन्हा पीडितेवर अत्याचार केले. सप्टेंबरमध्ये मुलगी गरोदर राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. सुरुवातीला हा आरोप फेटाळणाऱ्या शुक्लानं गुन्हा दाखल होताच पळ काढला. त्याच्या कुटुंबानेही मग कोपरखैरणे येथील फ्लॅट सोडला. आरोपी हरिशंकर शुक्ला हा दिल्लीत असल्याचे त्याच्या मोबाइल ट्रेसिंगवरून निदर्शनास आले होते. नंतर नेरुळ पोलीस ठाण्याचे तसेच नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथकाने दिल्लीत त्याचा शोध घेतला आणि अटक केले.
लैंगिक अत्याचार प्रकरणी शिक्षकाला १० वर्ष कारावास https://t.co/fUWIufX59Y
— Lokmat (@MiLOKMAT) July 9, 2019