२६ परदेशींच्या पोटात १०० कोटींचे ड्रग्ज, रुग्णालयात नेऊन केले जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 08:28 AM2022-09-18T08:28:55+5:302022-09-18T08:30:01+5:30

पाच वर्षांत अब्जावधींचा साठा जप्त

100 crore drugs in the stomach of 26 foreigners | २६ परदेशींच्या पोटात १०० कोटींचे ड्रग्ज, रुग्णालयात नेऊन केले जप्त

२६ परदेशींच्या पोटात १०० कोटींचे ड्रग्ज, रुग्णालयात नेऊन केले जप्त

Next

संतोष आंधळे

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टमचे अधिकारी एखाद्या व्यक्तीला अमली पदार्थ तस्करी प्रकरणात अटक किंवा संशयित म्हणून ताब्यात घेतात. त्या व्यक्तीने जर अमली पदार्थ कॅप्सूलच्या साह्याने गिळून टाकले असतील किंवा शरीराच्या  अन्य भागात लपविले असतील तर त्याचा शोध घेण्यासाठी  त्या आरोपीना शासनाच्या जे. जे. रुग्णालयात नेले जाते. गेल्या पाच वर्षांत २६ आफ्रिकन नागरिकांना या रुग्णालयत आणले असून, त्यांच्याकडून  कोकेन आणि हेरॉइन्सच्या २१०० कॅप्सूल काढण्यात आल्या आहेत. त्याची किंमत बाजारात १०० कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, जे. जे. रुग्णालयाच्या शल्यचिकित्सक विभागाचे डॉक्टर वैद्यकीयदृष्ट्या संशोधन करून लवकरच यासंदर्भात शोधनिबंध सादर करणार आहेत.  
अमली पदार्थांची तस्करी करणारे अनेक परदेशी नागरिक विविध क्लृप्त्या करतात. त्यातलीच एक युक्ती म्हणजे शरीरात कॅप्सूल लपविणे. काही महाभाग तर चक्क अमली पदार्थाच्या कॅप्सूल तयार करून त्या गिळतात. त्या पोटात सुरक्षित राहतात. काही प्रकरणांत तर महिलांनी निरोधचा वापर करत अमली पदार्थांच्या कॅप्सूल योनीमार्गात ठेवल्याचे प्रकारही आढळून आले आहेत. काहीवेळा या कॅप्सूल पार्श्वभागातही ठेवल्या जातात. 

असा काढला जातो ऐवज
nकस्टमचे अधिकारी विमानतळावर पकडलेल्या तस्कराला जे. जे. रुग्णालयात आणतात. 
nजे. जे. रुग्णालयात त्याच्या वैद्यकीय चाचण्या केल्या जातात. 
nतस्कराचे प्रथमत: एक्स-रे आणि सीटी स्कॅन केले जाते. त्यात कॅप्सूल कुठे लपविल्या आहेत, हे स्पष्ट होते. 
nआरोपीने गोळ्या गिळल्या असतील तर त्याला पचनसंस्थेशी निगडित औषधे देऊन नैसर्गिक विधीद्वारे त्या कॅप्सूल्स काढल्या जातात.
nत्यानंतर पुन्हा सीटी स्कॅन आणि एक्स-रे केले जाते. तस्करी करून आणलेल्या कॅप्सूल्सचा पंचनामा करून त्या कस्टम अधिकाऱ्यांच्या हवाली केल्या जातात.  

वैद्यकीय भाषेत बॉडी पॅकर्स
आमच्या रुग्णालयात अशा पद्धतीचे रुग्ण येत असतात. या व्यक्तींना वैद्यकीय भाषेत ‘बॉडी पॅकर्स’ असे म्हणतात. गेल्या पाच वर्षांत २६ बॉडी पॅकर्स आमच्याकडे आले असून, त्यापैकी ४ महिला होत्या, बाकी पुरुष होते. ते बहुतांश कॅप्सूल्स गिळून पोटात ठेवतात वा गुदद्वारात ठेवतात. तर महिला या योनीमार्गात या कॅप्सूल्स ठेवतात. स्त्रीरोगतज्ज्ञ त्याची तपासणी करून अमली पदार्थ त्यांच्याकडून हस्तगत करतात. बाकी बहुसंख्य प्रकरणे पोटातून तस्करी करत असल्याचीच आढळून आली आहेत. या सर्व प्रकरणांचा अभ्यास आम्ही करत असून, याच्यावर लवकरच शोधनिबंध सादर करण्यात येणार आहे.
- डॉ. अजय भंडारवार, शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख, जे. जे. रुग्णालय.

एक कॅप्सूल अडकली अन्...
काही दिवसांपूर्वी दाखल केलेल्या एका आरोपीच्या पोटातून एक गोळी नैसर्गिक विधीतून न निघाल्यामुळे ती पोटाच्या आतड्यामध्ये अडकून बसली होती. लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रियेद्वारे ती गोळी पोटातून काढण्यात आली. ही अशी पहिलीच वेळ होती. या आरोपीकडून तब्बल ११६ कॅप्सूल्स काढण्यात आल्या. 
- डॉ. अमोल वाघ, शल्य चिकित्सक, जे. जे. रुग्णालय. 

Web Title: 100 crore drugs in the stomach of 26 foreigners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.