चाणक्य ट्रॅव्हल्सच्या बसमधून 100 किलो गांजा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 16:36 IST2019-10-10T16:32:43+5:302019-10-10T16:36:49+5:30
पोलीस उपायुक्तांनी केली कारवाई

चाणक्य ट्रॅव्हल्सच्या बसमधून 100 किलो गांजा जप्त
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - तुर्भे येथून 110 किलो गांजा जप्त. चाणक्य ट्रॅव्हल्स मधून नेला जात होता गांजा. त्याची माहिती मिळताच एपीएमसी पोलिसांनी कारवाई करून चौघांना अटक केली आहे.
नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात गांजाचा पुरवठा होत असल्याचे उघडकीस येत आहे. मागील महिन्याभरात नवी मुंबई पोलिसांनी 120 किलोच्या आसपास गांजा जप्त केलेला आहे. त्यानुसार अमली पदार्थ विक्रीचे रॅकेट पूर्णपणे मोडीत काढण्याच्या सूचना पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी पोलिसांना दिल्या आहेत. त्यानुसार परिमंडळ १ मध्ये उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाया केल्या जात आहेत. अशातच गुरुवारी दुपारी चाणक्य ट्रॅव्हल्समधून नवी मुंबईत गांजा आणला जाणार असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सायन-पनवेल मार्गावर तुर्भे येथे सापळा रचला होता. यावेळी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वरिष्ठ निरीक्षक सतीश निकम, सहाय्यक निरीक्षक भूषण पवार यांच्या पथकाने चाणक्य ट्रॅव्हल्समधील मालाची झडती घेतली. यावेळी त्यामध्ये सामानाच्या आडून वाहतूक केला जाणारा 110 किलो गांजा आढळून आला. याप्रकरणी चौघांना ताब्यात घेण्यात आले असून एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक सतीश निकम अधिक तपास करत आहेत.
नवी मुंबई - चाणक्य ट्रॅव्हल्सच्या बसमधून 100 किलो गांजा जप्त https://t.co/mD82AatBXl
— Lokmat (@MiLOKMAT) October 10, 2019