"पप्पा, माझ्याकडून मोबाईल तुटला, मला माफ करा"; विद्यार्थिनीची हादरवून टाकणारी सुसाईड नोट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 11:53 AM2022-02-07T11:53:31+5:302022-02-07T11:57:17+5:30
Crime News : मोबाईल तुटल्याच्या भीतीपोटी मुलीने आपलं आयुष्य संपवलं. आत्महत्या करण्याआधी तिने एक सुसाईड नोट देखील लिहिली होती.
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान मन सुन्न करणारी एक घटना घडली आहे. दहावीच्या विद्यार्थिनीने मोबाईल तुटल्याच्या कारणावरुन टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गाझियाबादमधील सिहानी गेट पोलीस हद्दीत हा भयंकर प्रकार घडला आहे. मोबाईल तुटल्याच्या भीतीपोटी मुलीने आपलं आयुष्य संपवलं. विद्यार्थिनीने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी तिने एक सुसाईड नोट देखील लिहिली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
"पप्पा, माझ्याकडून मोबाईल तुटला होता, मला माफ करा" असं मुलीने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. आत्महत्येबाबत भाडेकरुंनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईल तुटल्याच्या भीतीपोटी दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबाद शहरात घडली आहे. टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी विद्यार्थिनीने वडिलांच्या नावे एक सुसाईड नोटही लिहिली होती. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून कुटुंबीयांची चौकशी करत आहेत.
फोन तुटल्याने वडील ओरडतील ही भीती; लेकीने टोकाचं पाऊल उचललं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा ही मूळची बिहारची आहे. मात्र ती गाझियाबादमध्ये आई-वडील आणि मोठ्या बहिणीसोबत राहत होती. पूजाचे वडील ई-रिक्षा चालवतात. पूजा ही दहावीची विद्यार्थिनी होती. पूजाची आई आणि मोठी बहीण काही कामानिमित्त बिहारला गेल्याचे सांगण्यात येत आहे. तर तिचे वडीलही बाहेर गेल्यामुळे घटनेच्या वेळी ती घरात एकटीच होती. तिने दुपारच्या सुमारास ओढणीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणीच्या जवळ सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये "पप्पा, माझा मोबाईल तुटला आहे, मला माफ करा" असं लिहिलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.