ठाणं हादरलं! टपली मारल्याच्या रागातून दहावीच्या विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 10:05 PM2021-10-26T22:05:22+5:302021-10-26T22:05:45+5:30
Murder Case : राजश्री शाहू महाराज विद्यालयातील घटना
ठाणे : ठाण्याच्या राजश्री शाहू महाराज विद्यालयातील तुषार साबळे (१५, रा. ज्ञानेश्वरनगर, वागळे इस्टेट, ठाणे) या दहावीतील विद्यार्थ्याची केवळ टपली मारल्याच्या रागातून त्याच शाळेतील,4 विद्यार्थ्यांनी चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यातील तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून चौथ्याचा शोध सुरू असल्याचे वागळे इस्टेट पोलिसांनी सांगितले.
वागळे इस्टेट ज्ञानेश्वरनगर परिसरातील राजश्री शाहू महाराज विद्यालयात मंगळवारी सकाळी दहावीची चाचणी परीक्षा होती. वर्ग भरल्यानंतर किरकोळ कारणावरून तुषार याच्यासह त्याच्या काही मित्रांनी आधीचा वाद उकरून काढला. सोमवारी दुपारी चार ते पाच जणांच्या दोन गटामध्ये टपली मारण्यावरून वाद निर्माण झाला होता. हाच वाद मंगळवारी पुन्हा उफाळून आला. तेव्हा दहावी ब तुकडीतील तुषार यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी गेला. तेव्हा त्यानेच टपली मारल्याचा समज झाल्याने त्याच्या छातीवर दहावी अ तुकडीतील एकाने चाकूने वार केले. त्याच वेळी त्याच्या अन्य तीन साथीदारांनीही त्याला मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या तुषारला तातडीने जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांमधील या हाणामारीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले, निरीक्षक विजय मुतडक आणि उपनिरीक्षक बाळासाहेब निकुंभ यांच्या पथकाने मुख्य सूत्रधारासह तीन १५ वर्षीय मारेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या अन्यही एका साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.