तीन काेटींच्या दरोड्यातील चार आराेपींना ११ दिवसांची काेठडी
By राजकुमार जोंधळे | Published: October 23, 2022 05:47 PM2022-10-23T17:47:29+5:302022-10-23T17:47:48+5:30
उर्वरित आराेपींच्या अटकेसाठी पाेलिसांचे प्रयत्न.
लातूर - कातपूर राेडवरील एका उद्योजकाच्या बंगल्यावर आठ ते दहा जणांच्या टोळीने १२ ऑक्टाेबर राेजी पहाटे सशस्त्र दराेडा टाकला. यावेळी तब्बल २ काेटी २५ लाखांची राेकड, ७३ लाखांचे साेने, असा तीन काेटींचा मुद्देमाल पळविला. दरम्यान, दरोड्यातील पाेलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांना लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ११ दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे.
लातुरातील उद्याेजक राजकमल अग्रवाल यांच्या बंगल्यावर दराेडा टाकण्याची याेजना वर्षभरापूर्वी आखली हाेती. यासाठी पुणे, जालना आणि लातुरातील आठ ते दहा जणांच्या टोळीने बुधवार, १२ ऑक्टोबर राेजी पहाटे २:३० ते ३:३० वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दराेडा टाकला. हा दराेडा टाकण्यासाठी दाेन टोळ्यांनी प्लॅन केला. लातुरातील एका आराेपीने दिलेल्या माहितीच्या आधारे हा दराेडा टाकल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्यानंतर दरोडेखोरांच्या हाती कोट्यवधींची राेकड आणि काही किलाे साेने लागले. हा मुद्देमाल त्यांनी दाेन ट्राॅलीतून कोंबून नेला. खबऱ्याच्या माहितीनुसार पहिल्यांदा लातुरातील किशाेर नारायण घनगाव (वय ३८, रा. बाभळगाव राेड) याला उचलण्यात आले.
त्यानंतर रेणापूर तालुक्यातील बावची येथील गणेश कोडिंगा अहिरे (वय ३०) यास अटक केली. या दाेघांनाही पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी दरोड्याची इत्यंभूत माहिती दिली. यावरून टक्कूसिंग अजित सिंग कल्याणी (वय ५०, रा. रामटेकडी, पुणे) आणि बल्लूसिंग अमरसिंग टाक (वय ३०, रा. तीर्थपुरी, ता. घनसांगवी, जि. जालना) या दाेघांना पुणे आणि जालन्यातून उचलले. त्यांच्याकडून ५० लाखांची राेकड आणि २९ लाखांचे साेन्याचे दागिने, असा मुद्देमाल जप्त केला. लातूर येथील न्यायालयात चार आराेपींना पाेलिसांनी हजर केले असता, न्यायालयाने ११ दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे. अधिक तपास पाेलीस निरीक्षक सुधाकर बावकर करीत आहेत.