इंपोर्टेड गिफ्टच्या नावावर महिलेला ११ लाखांचा गंडा; आरोपीचे तार दिल्लीशी जुळलेले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 06:08 PM2021-09-26T18:08:09+5:302021-09-26T18:18:13+5:30
Crime News : महिलेच्या तक्रारीवरून राजुरा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंविच्या ४२० कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
चंद्रपूर (राजुरा) : इंपोर्टेड गिफ्टच्या नावावर राजुरा येथील एका महिलेला तब्बल ११ लाखांनी गंडविल्याची खळबळजनक घटना पुढे आली आहे. आरोपीने Whats App कॉल करून ही फसवणूक केली आहे. आरोपीचे तार थेट दिल्लीशी जुळलेले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
महिलेच्या तक्रारीवरून राजुरा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंविच्या ४२० कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .यापूर्वी राजुरा शहरातील एका डॉक्टरला एक कोटीचे कर्ज काढून देतो म्हणून २० लाखांनी गंडविले होते. या दोन्ही प्रकरणाचे धागेदोरे दिल्लीपर्यंत पोहचले आहेत. राजुरा शहरातील एका महिलेला ऑनलाईन रिक्वेस्ट पाठवली. नंतर हळुहळू Whats Appवर नंबर घेतला. काही दिवसानंतर विदेशातून इंपोर्टेड गिफ्ट पाठवले आहे. दिल्ली येथे लटकले आहे. यासाठी पैशाची कमतरता आहे. पैसे पाठवा. मोठी मौल्यवान वस्तू आहे. ती आता नागपूरला आली आहे, अशी बतावणी करून चक्क ११ लाख रुपयांचा गंडा घातला. याची तक्रार राजुरा पोलिसात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचे तपास अधिकारी एस. वी. दरेकर म्हणाले, या प्रकरणाचे तार दिल्लीशी जुळले आहे. दिल्ली येथील अनेक एटीएममधून पैसे काढुन फसवणूक केली आहे. तो इतका गुन्ह्यात इतका तरबेज आहे की त्याने मोबाईलवरून कुठेही फोन केला नाही. फक्त Whats Appवरून कॉल करत होता. त्यामुळे आवश्यक डाटा उपलब्ध झाला नाही. राजुरा शहरात फसवणुकीचे जाळे पसरले आहेत. राजुरा पोलिस याबाबत कसून चौकशी करीत आहेत.