म्हाडाची रुम मिळवून देण्याच्या नावाखाली ११ लाखांची फसवणूक; नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा
By जितेंद्र कालेकर | Updated: May 10, 2024 22:58 IST2024-05-10T22:57:06+5:302024-05-10T22:58:35+5:30
आरोपी पसार; याप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला असून आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे नौपाडा पोलिसांनी शुक्रवारी सांगितले.

म्हाडाची रुम मिळवून देण्याच्या नावाखाली ११ लाखांची फसवणूक; नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: म्हाडाचा रुम मिळवून देण्याच्या नावाखाली एका भामटयाने सुरेश टेंभे (५४, रा. नौपाडा, ठाणे) यांची ११ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला असून आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे नौपाडा पोलिसांनी शुक्रवारी सांगितले.
टेंभे यांना मुंलूंडमध्ये वास्तव्याला असलेल्या जयेंद्र मोरे याने जुलै २०१९ ते ४ मार्च २०२२ या कालावधीमध्ये ठाण्यातील चंदनवाडी भागात म्हाडाचा रुम मिळवून देतो, असे अमिष दाखविले. त्यानंतर म्हाडामध्ये सहा लाख ५० हजार रुपये भरल्याची पावतीही त्यांना दाखवून बनावट पावती, म्हाडाचा लोगो, नाव आणि स्टॅम्प तसेच सुरेश टेंभे सदनिका क्रमांक १७०४ असलेले बनावट अलॉटमेंट पत्र देऊन त्यांच्याकडून १४ लाख ५० हजारांची रोख आणि धनादेशाने घेतले. त्यापैकी तीन लाख ५० हजारांची रक्कम त्यांना परत केली. परंतू, उर्वरित ११ लाख रुपये परत न करता त्यांची फसवणूक केली. याच फसवणूकीबाबत टेंभे यांनी ७ मे २०२४ रोजी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.