रहस्यमय! एकाच कुटुंबातील ११ जणांचे मृतदेह सापडले; हत्या की आत्महत्या? पोलिसांचा तपास सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 15:23 IST2020-08-09T15:21:58+5:302020-08-09T15:23:59+5:30
या परिसरात ११ मृतदेह एकाच वेळी सापडल्याने खळबळ उडाल्याचं वातावरण आहे. याची सर्वत्र चर्चा होत आहे.

रहस्यमय! एकाच कुटुंबातील ११ जणांचे मृतदेह सापडले; हत्या की आत्महत्या? पोलिसांचा तपास सुरु
जोधपूर - राजस्थानच्या जोधपूरमध्ये ११ पाकिस्तानी शरणार्थींचा मृत्यू झाले आहेत. सध्या या मृत्यूचं कारण अस्पष्ट आहे. प्रथमदर्शनी विषारी गॅस अथवा रासायनिक विष प्यायल्याने मृत्यू झाल्याचं दिसून येत आहे. देचू ठाणे हद्दीतील लोडता परिसरातील ही घटना आहे. हे सर्व मृत व्यक्ती पाकिस्तानातून विस्थापित होऊन आले होते. अचलावता गावात हे सर्व शेतीची कामे करत होते, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
या परिसरात ११ मृतदेह एकाच वेळी सापडल्याने खळबळ उडाल्याचं वातावरण आहे. याची सर्वत्र चर्चा होत आहे. स्थानिक लोक त्यावर काहीही बोलण्यापासून दूर राहत आहेत. माहितीनुसार या घटनेत ६ प्रौढ आणि ५ मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यातील सात महिला आणि चार पुरुष असल्याचे पोलीस अधिकारी राजू राम यांनी सांगितले. पोलीस परिसरातील लोकांची चौकशी करत आहेत. पाकिस्तानमधील शरणार्थी मोठ्या प्रमाणात राजस्थानच्या सीमावर्ती गावात आश्रय घेत असतात. बहुतेक अनेक गावांची संपूर्ण लोकसंख्या पाकिस्तानी शरणार्थींची आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कुटुंबातील एक बहीण, जी व्यवसायाने नर्स आहे, आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी ती येथे आली होती. या बहिणीने पहिल्यांदा १० लोकांना विषारी इंजेक्शन दिले. त्यानंतर त्याने स्वत: ला इंजेक्शन देऊन संपवले असावे अशी शंका स्थानिकांनी व्यक्त केली आहे. पोलिसांच्या तपासणीदरम्यान या कुटुंबात एकूण ११ जण असल्याचे समजले आणि एक बहिण येथे आली होती. यानंतर, त्याठिकाणी एकूण १२ लोक उपस्थित होते, त्यापैकी ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबातील एक सदस्य शेताच्या दिशेकडे गेला होता, त्याठिकाणी रात्री त्याला झोप आली, त्यानंतर सकाळी उठून तो घराकडे आला, तेव्हा घरातील सर्वच मृत्यू झाल्याचं त्याने पाहिलं.
सध्या दुर्घटनास्थळी कोणालाही प्रवेश दिला जात नाही, ज्या खोलीत ही घटना घडली त्या ठिकाणी पोलिसांनी बंदी घातली आहे. आता पोलीस एफएसएलची टीम तिथे पोहोचण्याची वाट पाहत आहेत. एफएसएल टीम घटनास्थळावरील सर्व पुरावे गोळा करुन तपासाला योग्य दिशा देऊ शकतील असा पोलिसंना विश्वास आहे. पोलीस सर्वबाजूने या प्रकरणाचा तपास करत आहे, यात खून, आत्महत्या आणि अपघाताचा तपास करत आहेत, कुटुंबात जिवंत असलेला एकमेव सदस्याकडेही संशयाने पाहिलं जात आहे.