‘स्पेशल २६’ स्टाईल छापा टाकणारे ११ तोतये अटकेत; ऐरोलीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 03:57 PM2023-08-01T15:57:07+5:302023-08-01T15:57:17+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कांतिलाल यादव यांच्यासोबत हा प्रकार घडला होता.
नवी मुंबई : निवृत्त शासकीय अधिकाऱ्याच्या घरी लाचलुचपत प्रतिबंध विभागाचा छापा पडल्याचे भासवून ३४ लाख ८५ हजारांचा ऐवज लुटणाऱ्या टोळीला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी वापरलेल्या दोन कार व लुटलेला २५ लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कांतिलाल यादव यांच्यासोबत हा प्रकार घडला होता. त्यांच्या ऐरोली येथील घरी २१ जुलैला अज्ञात सहाजणांनी ते लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे कर्मचारी असल्याचे सांगून छापा टाकला होता. त्यांनी यादव यांच्या घरातून तब्बल ३४ लाख ७५ हजारांचा ऐवज एकत्र करून लुटला होता. यादव यांना दोन दिवसांनी संशय आल्याने तिसऱ्या दिवशी त्यांनी रबाळे पोलिसांकडे तक्रार केली होती.
गुन्हा दाखल होताच उपायुक्त विवेक पानसरे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कोते यांनी निरीक्षक भागुजी औटी, सहायक निरीक्षक राकेश पगारे, दीपक खरात, उपनिरीक्षक दयानंद वणवे, हवालदार प्रसाद वायंगणकर, दर्शन कटके, टिकेकर, आदींचे पथक केले होते. त्यांनी परिसरातले सीसीटीव्ही तपासून संशयित कारची माहिती मिळवली होती. त्या आधारे पुणे, कल्याण, मुंबई परिसरातून शिताफीने अकरा जणांना अटक केली. दीपक कविटकर (४७), नरेश मिश्रा (५२), रूपेश नाईक (४२), सिद्धेश नाईक (३२), मुस्तफा करंकाळी (४०), विजय बारात (४३), देवेंद्र चाळके (३२), किशोर जाधव (४७), जुल्फिकार शेख (४३), वसीम मुकादम (३९) व आयुब खान (५०) अशी त्यांची नावे आहेत. अशा प्रकारे लुटमारीचा त्यांचा पहिलाच गुन्हा असून, काहींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पोलिसांना पाहिजे असलेल्या व्यक्तींनी तीन वेगवेगळ्या टोळ्यांच्या व्यक्तींना एकत्र करून कट रचला होता. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन कार व लुटीचा २५ लाखांचा ऐवज हस्तगत केल्याचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले.
तीन महिन्यांपासून तयारी
- यादव यांच्या घरावर छापा टाकण्याची तीन महिन्यांपासून गुन्हेगारांची तयारी सुरू होती.
- एप्रिलमध्ये देखील त्यांनी छापा टाकण्याचा प्रयत्न केला असता काही कारणाने तो रद्द केला होता. त्यानंतर २१ जुलैला त्यांनी नियोजनाप्रमाणे छापा टाकला होता.
एकमेकांनाही अनोळखी
अटक केलेले सर्वजण तीन वेगवेगळ्या गटातले असून, गुन्हा करताना ते घरात घुसले तेव्हाही ते परस्परांशी अनोळखी होते.
टीप कोट्यवधींची, हाती लाखो
यादव यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची अपसंपदा असल्याची टीप काही व्यक्तींना मिळाली होती. यावरून त्यांनी स्पेशल २६ प्रमाणे छापा टाकून लुटीचा बनाव रचला होता. प्रत्यक्षात मात्र ३४ लाख हाती लागल्याने त्यांचीही निराशा झाली होती.