५० कोटींच्या जमिनीसाठी ११.५० कोटीचा खर्च; भूमी अभिलेखमधील अधिकाऱ्यासह दोघांना बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 07:15 PM2019-04-23T19:15:35+5:302019-04-23T19:16:45+5:30
एका अधिकाऱ्यासह दोघांना इओडब्ल्यूने नुकतीच अटक केली.
मुंबई - खंडाळ्यातील ५० कोटींची बेवारस जमीन बळकावण्यासाठी बांधकाम व्यावसायिक युसूफ लकडावाला याने ११ कोटी ५० लाख खर्च केले आहेत. ही रक्कम सरकारी अधिकाऱ्याला लाच व दलालांना दलाली देण्यासाठी खर्च केल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या (इओडब्ल्यू) तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी एका अधिकाऱ्यासह दोघांना इओडब्ल्यूने नुकतीच अटक केली.
भूमी अभिलेख विभागातील अधिकारी विकास ढेकळे आणि दलाल दीपक गुप्ता यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. तसेच यापूर्वी बांधकाम व्यावसायिक युसूफ आणि शौकल घोरी यांना अटक झाली होती. ११.५० कोटींतील सर्वांत मोठा वाटा म्हणजेच पाच कोटी ढेकळेच्या वाट्याला आले आहेत. बनावट डीडी आणि करारपत्र तयार करून जमीन कशी बळकावता येईल, बनावट कागदपत्रे खरी कशी भासवता येतात, याबाबत ढेकळेने युसूफला यंत्रणेतील पळवाटा सांगितल्या होत्या. गुप्ताला एक कोटी; तर घोरीला दीड कोटी रुपये देण्यात आले. आरोपी मोहन नायर याला युसूफकडून या कामासाठी चार कोटी मिळाल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. या प्रकरणातील गहाळ कागदपत्रांबाबत दुय्यम निबंधक कार्यालयाकडून इओडब्ल्यूकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी युसूफला अटक केली होती. सर्व आरोपी 26 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे. नायर मात्र अद्याप पोलिसांच्या जाळ्यात सापडलेला नाही.