चाळीसगावला शिवसेना शहरप्रमुखाच्या घरी चोरट्यांचा डल्ला, १२ ते १५ लाखाचा ऐवज लांबविला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2019 12:52 PM2019-07-06T12:52:10+5:302019-07-06T12:52:23+5:30
चाळीसगाव येथील शिवसेनेचे शहरप्रमुख, नगरसेवक व के.आर.कोतकर कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन श्यामलाल कुमावत यांच्या घरातून चोरट्यांनी १२ ते १५ लाखांचा ऐवज लुटून नेला.
जळगाव - चाळीसगाव येथील शिवसेनेचे शहरप्रमुख, नगरसेवक व के.आर.कोतकर कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन श्यामलाल कुमावत यांच्या घरातून चोरट्यांनी १२ ते १५ लाखांचा ऐवज लुटून नेला. ही घटना औरंगाबाद रोडलगतच्या प्रभात गल्लीत शनिवारी पहाटे घडली.
कुमावत यांचे शेजारी - शेजारीच तीन घरे आहेत. यापैकी एका घरी चोरट्यांनी कपाटांमधील साहित्य अस्ताव्यस्त फेकून रोख रकमेसह सोन्या - चांदीचे दागिने लांबविल्याचा अंदाज आहे.
कुमावत यांच्या घरासमोरील विनायक शिंपी यांच्याकडे चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. यानंतर अन्य काही घरांच्या कड्या बाहेरुन लावल्याचे आढळून आले. कुत्रेही गुंगीत असल्याचे दिसून आले. थोड्या वेळात कुमावत यांचेही घर चोरट्यांनी फोडले असावे, असा अंदाज आहे.
चोरी झाल्याचे लक्षात येताच कुमावत यांनी तातडीने पोलिस स्टेशनला कळविले. घटनास्थळाळी शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोही व पोलिस पथकाने पाहणी केली.