खेळणं जीवावर बेतलं, गळफास लागल्याने एकुलत्या एक मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 08:50 PM2022-05-17T20:50:41+5:302022-05-17T20:51:33+5:30

crime news : कुटुंबातील एकुलता मुलगा गेल्याने पालकांना धक्का

12 years old boy dies of strangulation when he was playing | खेळणं जीवावर बेतलं, गळफास लागल्याने एकुलत्या एक मुलाचा मृत्यू

खेळणं जीवावर बेतलं, गळफास लागल्याने एकुलत्या एक मुलाचा मृत्यू

Next

खामगाव  (बुलडाणा ) : खांबाला रुमाल बांधून त्यासोबत खेळताना बारावर्षीय मुलाला गळफास लागला. ही बाब लक्षात येताच त्याला खाली उतरवून वडिलांना बोलावयाला गेलेली आई परत आल्यानंतर त्याला दवाखान्यात नेण्यात आले. तेथे डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना खामगावातील मीरा नगरात मंगळवारी दुपारी ४.३० वाजता घडली. कुटुंबातील एकुलता मुलगा हिरावल्याने पालकांना मानसिक धक्का बसला आहे.


मंगळवारी दुपारी पूर्वेश वंदेश आवटे (१२) आई संगीतासह घरीच होता. त्यावेळी आईला बाहेर खेळतो, असे सांगून तो घराच्या मागे गेला. तेथे त्याने आडव्या लोखंडी पाइपला रुमाल बांधून खेळायला सुरुवात केली. त्यावेळी अचानक गळफास लागला. ही बाब आई संगीताच्या लक्षात आल्याने तिने त्याला खाली काढले. दुपारी प्रचंड ऊन असल्याने, तसेच आजूबाजूला कुणी नसल्याने संगीताने त्याचे वडील वंदेश यांना बाेलावण्यासाठी त्यांच्या कामाचे ठिकाण गाठले. वडील घरी आल्यानंतर नागरिकांसह त्याला दवाखान्यात नेण्यात आले. तेथे डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. खासगी कंपनीत काम करणारे वडील फावल्या वेळात भाजीपाला व्यवसाय करतात, तर आई घरकाम करते. या कुटुंबात पूर्वेश एकटाच होता, तर दोन वर्षांपूर्वी या दाम्पत्याला झालेल्या मुलीचेही निधन झाले होते. या घटनेने आई- वडील दोघेही मूक झाले. त्यांना मानसिक धक्का बसला.

यू ट्यूब, इन्स्टाग्रामवर सतत सक्रिय
पूर्वेश हा मोबाइलमध्ये यू-ट्यूब आणि इन्स्टाग्रामवर सतत सक्रिय होता. या माध्यमावर असलेल्या साहसी उपक्रमाची त्याला आवड होती. त्याप्रमाणेच काहीतरी करण्याचा त्याचा नेहमी प्रयत्न असायचा. त्याच्या या आवडीमुळेच कदाचित त्याला गळफास लागल्याची चर्चा परिसरात होती.

 

Web Title: 12 years old boy dies of strangulation when he was playing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.