तब्बल पावणेपाच कोटींचा 1200 ड्रोनचा साठा जप्त; जेएनपीटी बंदरात मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 08:11 AM2022-03-20T08:11:25+5:302022-03-20T13:55:50+5:30
तस्करी मार्गाने आयात ड्रोनची किंमत सुमारे पाच कोटींच्या घरात आहे. याआधीही डीआरआयच्या विभागाने ३६ ड्रोनचा साठा जप्त केला होता.
उरण : जेएनपीटी बंदरातून रक्तचंदनानंतर आता चीनने बंदी घालण्यात आलेल्या खेळण्यातील ड्रोनच्या तस्करीला सुरुवात झाली आहे. न्हावा -शेवा सीमा शुल्क विभागाच्या क्राइम इंटेलिजेन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी इंधन पंपाच्या नावाने आयात करण्यात आलेला १२०० ड्रोनचा साठा एका ४० फुटी कंटेनरमधून ताब्यात घेण्यात आला आहे. तस्करी मार्गाने आयात ड्रोनची किंमत सुमारे पाच कोटींच्या घरात आहे. याआधीही डीआरआयच्या विभागाने ३६ ड्रोनचा साठा जप्त केला होता.
जेएनपीटी बंदरातून याआधी सोने, चांदी, शस्त्रास्त्रे, अमली पदार्थ, सापांच्या कातडीची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जात होती. त्यानंतर मागील काही वर्षांपासून आखाती देशात निर्यात होणाऱ्या रक्तचंदनाच्या तस्करीला उधाण आले आहे. त्यानंतर आता देशातबंदी घालण्यात आलेल्या चीनच्या ड्रोनच्या तस्करीला सुरुवात झाली आहे. गुप्त माहितीच्या आधारावरच बंदीनंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर ड्रोनचा साठा जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधीही जेएनपीटी बंदरातून चीनमधून आयात करण्यात आलेल्या १४.११ लाख किमतीचा ३६ ड्रोनचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
देशातील ड्रोनच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून भारत सरकारने काही अपवादांसह परदेशी ड्रोनच्या आयातीवर बंदी घातली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत फॉरेन ट्रेड महासंचालनालयाने गेल्या महिन्यात परदेशी ड्रोनच्या आयातीवर बंदी घालणारी अधिसूचना जारी केली आहे.
जेएनपीटीतून चिनी बनावट ड्रोनची तस्करी; क्राइम इंटेलिजेन्स युनिटची कारवाई; तस्करीसाठी न्हावा-शेवा सांकेतिक नाव
देशात आयातीवर बंदी घालण्यात आलेल्या या चिनी बनावटीच्या ड्रोनची तस्करी करण्यासाठी तस्करांनी याला “न्हावा शेवा” असे सांकेतिक नाव दिले आहे. याच सांकेतिक नावाने या ड्रोनची तस्करी केली जात असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.