भिवंडीतून १२ हजार जिलेटीन कांड्या जप्त; गुन्हे शाखेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 08:49 AM2021-05-19T08:49:57+5:302021-05-19T08:50:15+5:30
आरोपीस पाच दिवसांची कोठडी
भिवंडी : मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटीनच्या कांड्या सापडल्यानंतर स्फोटकांच्या बेकायदा साठ्यांवर ठिकठिकाणी धाडसत्र सुरू झाली होती. सोमवारी भिवंडीतील कारीवली गावाच्या हद्दीत असलेल्या खदानीच्या बाजूला असलेल्या कार्यालयात जिलेटीनच्या बेकायदा साठ्यावर ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून १२ हजार जिलेटीनच्या कांड्या जप्त केल्या. या प्रकरणी एकास अटक केली असून, त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, २२ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गुरुनाथ काशीनाथ म्हात्रे (५३) असे आरोपीचे नाव असून आहे. त्याने आपल्या कारीवली येथील महेश स्टोन चाळीत असलेल्या कार्यालयाच्या स्टोअर रूममध्ये मानवी जीवितास धोका निर्माण होईल, हे माहीत असूनही सोलर इंडस्ट्रीज कंपनीचे २५ किलो वजनाचे एकूण ६० बॉक्स ठेवले होते. त्यात एकूण ११ हजार ४०० जिलेटीनच्या कांड्या होत्या. ज्याचे एकूण वजन १,५०० किलो असून, डेक्कन पॉवर कंपनीचे तीन बॉक्स सापडले. या प्रत्येक बॉक्समध्ये २०० जिलेटीन स्फोटक पदार्थाच्या कांड्या अशा एकूण ६०० जिलेटीन स्फोटक पदार्थाच्या कांड्या ज्याचे एकूण वजन ७५ किलो आहे. अशा एकूण १२ हजार जिलेटीनच्या कांड्या व सोलर कंपनीचे २,५०८ इलेक्ट्रिक डेटोनेटर व डेक्कन कंपनीचे ५०० इलेक्ट्रिक डेटोनेटर असे एकूण ३,००८ डेटोनेटर सापडले. एकूण २ लाख ७ हजारांचा स्फोटक पदार्थांचा साठा विनापरवाना व बेकायदा साठविल्याचे आढळले.
या साठ्याबाबत ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकला माहिती मिळताच त्यांनी छापा टाकून बेकायदा जिलेटीनचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास ठाणे गुन्हे युनिट एकचे सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल जाधव करीत आहेत, तर घटनास्थळी ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त यांच्यासह भिवंडीचे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.ए. इंदलकर, ठाणे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. अंटालियाजवळ २५ जिलेटिनच्या कांडया स्कॉर्पिओ कारमध्ये सापडल्या होत्या. त्यामध्ये इलेक्ट्रिक डेटोनेटरही नव्हते. भिवंडीत तर मोठ्या प्रमाणात जिलेटीनच्या कांडयांसह इलेक्ट्रिक डेटोनेटरही मिळाले आहे.