ठाणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्कच्या विशेष मोहिमेत दारुसह १३ लाखांचा ऐवज जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 09:05 PM2022-01-30T21:05:08+5:302022-01-30T21:06:07+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाणे जिल्हयातील विविध भागांमध्ये एका विशेष मोहिमेमध्ये दारुची बेकायदेशीर निर्मिती आणि विक्री करणाऱ्या १२ जणांना अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाणे जिल्हयातील विविध भागांमध्ये एका विशेष मोहिमेमध्ये दारुची बेकायदेशीर निर्मिती आणि विक्री करणाऱ्या १२ जणांना अटक केली. त्यांच्याकडून मद्य निर्मितीसाठी लागणा:या ५२ हजार ६०० लीटर रसायनासह १३ लाख १९ हजार ५२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाण्याचे अधीक्षक निलेश सांगडे यांनी रविवारी दिली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सहा वेगवेळया पथकांनी अधीक्षक सांगडे आणि उपअधीक्षक चारुदत्त हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हयातील अंबरनाथमधील बोहनेली गाव, द्वारली गाव आणि मानेरा गाव, ठाण्यातील दिवा आणि मुंब्रा तसेच कल्याणमधील आलीमघर, उंबर्डे गाव आणि कोपर भाईंदरमधील मोर्वा गावाच्या पूर्वेस, खाडी किनारी, तिवराच्या झाडांमध्ये तसेच शहापूरातील सरळाबे गाव नदी किनारी हे धाडसत्र राबविण्यात आले. याप्रकरणी शहापूर, खडकपाडा, बाजारपेठ, मुंब्रा, रामनगर आणि भाईंदर आदी पोलीस ठाण्यांमध्ये २४ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
२८ आणि २९ जानेवारी २०२२ रोजी विशेष मोहिमेद्वारे ही कारवाई करण्यात आली. त्यातील १२ वारसदारांचे तर १२ बेवारस स्वरुपाचे गुन्हे होते. या कारवाईत १२ जणांना अटक केली असून मद्य निर्मितीसाठी लागणाऱ्या रसायनासह ८.०० बल्क लीटर देशी दारु, १४० बल्क लीटर ताडी, ७.१५ बल्क लीटर बियर आणि एक मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.