ऑनलाइन गंडा घालणाऱ्याचे १३ लाख रुपये गोठविले, सांगलीत केली कारवाई
By शरद जाधव | Published: March 19, 2023 08:39 PM2023-03-19T20:39:01+5:302023-03-19T20:39:41+5:30
‘सायबर’ची कामगिरी, कस्टम डयूटी भरा म्हणून केली होती फसवणूक
शरद जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: येथील डॉक्टर महिलेला फोन करून आपले पार्सल कस्टम कार्यालयाने जप्त केले असून त्याचा ९८ हजार ३२६ रुपये दंड भरावा लागेल म्हणत पैसे उकळणाऱ्याचे बँक खातेच सायबर पोलिसांनी गोठविले. सांगली सायबर पोलिसांच्या टिमने तक्रार येताच तात्काळ तपास सुरू करत हे खाते ब्लॉक केले. या खात्यावर १३ लाख २९ हजार रुपयांची रक्कम होती.
येथील डॉ. साेनिका मियापुरम यांना बुधवारी एक फोन आला. बोलणाऱ्या व्यक्तीने आपण सायबर क्राईम ब्रॅन्च मुंबईचा वरिष्ठ पोलिस अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. आपले एक पार्सल आले असून, ते कस्टम विभागाने जप्त करत आपल्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आपणास ९८ हजार ३२६ रुपयांचा दंड भरावा लागेल असे सांगितले. यानंतर डॉ. मियापुरम यांनी ऑनलाइन पद्धतीने ही रक्कम त्या व्यक्तीच्या बँक खात्यावर भरली. परंतु, पैसे भरल्यानंतर त्यांना शंका आल्याने त्यांनी सायबर पोलिसात तक्रार केली.
यानंतर सायबरचे उपनिरीक्षक रोहिदास पवार यांच्या पथकाने फसवणूक करण्यात आलेली रक्कम येस बँकेच्या खात्यावर गेल्याचे शोधून काढले. यानंतर तात्काळ बँकेशी व्यवहार करून खात्याची माहिती घेतली. यावेळी या खात्यावर १३ लाख २९ हजार रुपये असल्याची माहिती मिळाली. यानंतर पुढील तपासासाठी हे बँकखाते गोठविण्यात आले आहे.
सायबरचे उपनिरीक्षक पवार यांच्यासह सचिन कोळी, अमोल क्षीरसागर, करण परदेशी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.