१३ वर्षीय पीडितेचे लैंगिक शोषण; गर्भवती झाल्यानंतर ८० हजार रुपयांत गर्भपाताचा सौदा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 09:22 AM2022-01-14T09:22:23+5:302022-01-14T09:22:32+5:30
विदर्भातील पहिलीच घटना
- चैतन्य जोशी
वर्धा : राज्यभर गाजलेल्या परळी येथील स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणानंतर आर्वी येथेही अल्पवयीन पीडितेच्या गर्भपातानंतर पोलीस तपासामध्ये रुग्णालय परिसरातून मानवी कवट्या आणि हाडे सापडल्याने या रुग्णालयात भ्रूणहत्येचा काळाबाजारच सुरू असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
बीड जिल्ह्यातील परळीनंतर विदर्भात ही अशी पहिलीच घटना घडल्याने डॉक्टरी पेशाला काळिमा फासण्याचा प्रकार घडला आहे.
या घटनेने राज्यभर खळबळ निर्माण झाली असून, अधिक तपासाकडे लक्ष लागले आहे. परळी येथे डॉ. सुदाम मुंडे, त्याची पत्नी सरस्वती मुंडे आणि पीडितेचा पती महादेव पेटकर यांनी स्त्रीभ्रूणहत्येचा कारखानाच उघडला होता. डॉक्टर दाम्पत्याने गर्भपात केलेल्या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर हे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजले.
परळी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा तसेच अवैध गर्भलिंगनिदान चाचणी कायद्यान्वये गुन्हा दाखल होता. पोलिसांनी तपास केला असता डॉक्टर दाम्पत्याने अनेक गर्भपात करुन तीन अर्भके प्लास्टिकच्या पिशवीत भरून त्याच्या शेतातील पडक्या विहिरीत टाकल्याची धक्कादायक बाब पुढे आली होती. अशाच प्रकारची घटना आता वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे उघडकीस आली आहे. पोलीस कोठडीदरम्यान रुग्णालय परिसरामागे अनेक भ्रूण अवशेष पुरल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी रुग्णालय परिसराच्या मागे खोदकाम सुरु केले. अखेर बायोगॅसच्या चेंबरमध्ये ११ मानवी कवट्या आणि ५४ हाडे आढळून आली.
असे उलगडत गेले रहस्य
अवघ्या १३ वर्षीय पीडितेचे लैंगिक शोषण करून तिला गर्भवती बनविले. ही बाब घरच्यांच्या लक्षात येताच ते अल्पवयीन मुलाच्या घरी त्याच्या आई-वडिलांना समजावण्यासाठी गेले. ते पोलिसात जाण्याच्या बेतात असतानाच मुलाच्या आई-वडिलांनी त्यांना अडवून आम्ही पैसे लावतो, पीडितेचा गर्भपात करू, पोलिसात जाऊ नका. पोलिसात गेलात तर तुमच्या मुलीचीच बदनामी होईल, अशी भीती दाखवली. पीडितेच्या घरच्यांनी बदनामीखातर त्यांचे ऐकले. ८० हजार रुपयांत गर्भपाताचा सौदा झाला. डॉ. रेखा कदम हिने आधी ३० हजार घेतले आणि उर्वरित रक्कम नंतर देण्यास सांगितले. मात्र, पीडितेच्या घरच्यांनी याची शनिवारी रात्रीच पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी रविवारी सकाळी डॉ. रेखा कदमसह मुलाच्या आई व वडिलांना अटक केली.