मागील चार वर्षात १३०० बालके परतली स्वगृही; ठाणे शहर पोलिसांना यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 08:30 PM2018-02-10T20:30:11+5:302018-02-10T20:34:51+5:30
ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात स्थापन झाल्यापासून ठाणे चाईल्ड प्रोटेक्शन युनीटने मागील चार वर्षात तब्बल १ हजार २८४ हरवलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना सुखरुपपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. तसेच विशेष योजनेंतर्गत राबवलेल्या पाचव्या ‘आॅपरेशन मुस्कान’ अंतर्गत एकूण ६३७ बालकांना स्वगृही पाठवून त्यांच्या पालकांवरील हरवलेली ‘मुस्कान’ पुन्हा परत आणली आहे.
हरवलेले आणि पळवून नेलेल्या मुलांच्या शोधण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या घरापर्यंत सुखरुप पोहचविण्यासाठी १७ जुलै २०१४ मध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात चाईल्ड प्रोटेक्शन युनीटची स्थापना करण्यात आली. याचदरम्यान, २०१४ ते २०१६ या वर्षात १,०३६ तर २०१७ मध्ये २४८ अशी एकूण १,२८४ बालकांना ठाणे शहर पोलिसांनी युनीटने शोधून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. तसेच २०१७ मध्ये ५ भिक्षेक-यांवर कारवाई करून त्यांची रवानगी चेंबूर येथे शासकीय भिक्षेकरी स्वीकार केंद्रात केली आहे. तसेच शासनाच्या आदेशानुसार राबविलेल्या विशेष पाचव्या ‘आॅपरेशन मुस्कान’ यामध्ये एकूण ६३७ बालकांचा शोध घेऊन त्यांना स्वगृही धाडण्यात यश आले. दरम्यान,त्या बालकांसह त्यांच्या आई-वडिलांचे या युनीटद्वारे समुपदेशन करण्यात आले आहे. तर, स्वगृह परतलेल्या बालकांमध्ये मुलीचे प्रमाण अधिक असून बहुतेक बालके ही परराज्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कामगिरी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलीस सहआयुक्त मधुकर पाण्डये, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे,पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे, सहायक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले व ठाणे शहर चाईल्ड प्रोटेक्शन युनीटचे अधिकारी व कर्मचा-यांनी केली.