१३७ बळी घेणारे चालक मोकाटच; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये अपघात करून झाले फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 01:41 AM2021-02-15T01:41:52+5:302021-02-15T01:42:11+5:30
Crime News : रस्ते अपघात ही नवी मुंबईची गंभीर समस्या बनत चालली आहे. अपघाताला कारणीभूत ठरणारी रस्त्यावरील परिस्थिती तसेच वाहनचालकांचा बेशिस्तपणा यामुळे हे अपघात घडत आहेत.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : मागील दोन वर्षांत नवी मुंबईसह पनवेल व उरण परिसरात अपघातांमध्ये ५०३ जणांचा बळी गेला आहे. त्यापैकी १३७ जणांचा बळी घेणारे वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाल्याने ते अद्यापही मोकाटच आहेत. भविष्यातही त्यांच्याकडून अपघात घडण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये बेशिस्त वाहनचालकांविषयी दहशत निर्माण झाली आहे.
रस्ते अपघात ही नवी मुंबईची गंभीर समस्या बनत चालली आहे. अपघाताला कारणीभूत ठरणारी रस्त्यावरील परिस्थिती तसेच वाहनचालकांचा बेशिस्तपणा यामुळे हे अपघात घडत आहेत. अनेकदा अपघात करून वाहनचालक घटनास्थळावरून पळदेखील काढतात. त्यामुळे बहुतांश अपघातांचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही. नुकतेच पामबीच मार्गावर एपीएमसी येथे घडलेल्या अपघातामध्ये पोलीसपुत्र भावंडांना प्राण गमवावा लागला आहे. याप्रकरणी कार चालवणाऱ्या हॉटेल व्यावसायिक रोहन अबॉट याने घटनास्थळावरून पळ काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांपुढे शरणागती पत्करली. या गुन्ह्यात न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली आहे. अशाच अपघातांमध्ये नवी मुंबईसह पनवेल व उरण परिसरात दोन वर्षांत ५०३ जणांचा बळी गेला आहे. त्यापैकी २३२ जणांचा मृत्यू गतवर्षात झाला असून, २०१९ मध्ये २७१ जणांनी अपघाती प्राण गमावले आहेत. त्यापैकी १३७ जणांचा बळी घेणारे वाहनचालक अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नसल्याने ते मोकाटच आहेत. त्यामध्ये २०२० मधील ७८, तर २०१९ मधील ५९ अपघातांचा समावेश आहे. सायन पनवेल मार्ग, ठाणे बेलापूर मार्ग, तसेच पामबीच व शहरांतर्गतच्या मार्गावर घडलेले हे अपघात आहेत.
मागील दोन वर्षांत नवी मुंबईत तब्बल १,३३४ अपघात घडले आहेत.