१४ कोटीच्या बनावट नोटा नाही तर..., समीर वानखेडे यांनी नवाब मालिकांना दिले सडेतोड उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 10:02 PM2021-11-10T22:02:19+5:302021-11-10T22:03:06+5:30
Sameer Wankhede : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) हे प्रकरण ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) संपर्क साधला होता, पण त्यांनी तसे केले नाही, असे समीर वानखेडे यांनी म्हटले आहे.
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी बुधवारी महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले आहे. ऑक्टोबर २०१७ रोजी बीकेसीमध्ये महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) छापा टाकत १४ कोटी ५६ लाख रुपयांचे बनावट चलन जप्त केले होते. त्यावेळी समीर वानखेडेंकडे हे प्रकरण होते. हे प्रकरण दाबण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी समीर वानखेडेंची मदत घेतली होती. तसेच हाजी अरफातच्या भावाचे प्रकरण मिटवले असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. त्यावर समीर वानखेडे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
१४ कोटी ५६ लाख रुपयांच्या जप्तीला आठ लाख ८० हजार रुपये दाखवून प्रकरण मिटवण्यात आले. आरोपीला काही दिवसांनी जामीन मिळाला. हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले नाही असे गंभीर आरोप नवाब मलिकांनी केले होते. त्यावर समीर वानखेंडेंनी हे आरोप खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे. MID DAYच्या वृत्तानुसार, २०१७ मध्ये जप्त केलेल्या बनावट नोटांचे मूल्य सुमारे १४ कोटी नाही तर सुमारे १० लाख होते आणि या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली होती. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) हे प्रकरण ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) संपर्क साधला होता, पण त्यांनी तसे केले नाही, असे समीर वानखेडे यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी काल नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप कागदपत्रे दाखवून केला होता. त्यानंतर नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधांचा हायड्रोजन बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला होता. मलिक यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांच्यावर अनेक आरोप केले. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रात बनावट नोटांचा खेळ सुरू होता. साडे १४ कोटींच्या बनावट नोटा सापडल्यानंतर हे प्रकरण फडणवीस यांनी दाबल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला. मलिकांनी अनेकांची नावे घेतली, त्यामध्ये भाजपा नेते हाजी अराफत शेख यांचंही नाव घेण्यात आलं.