मुंबईतील दोन व्यावसायिकांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 10:07 PM2023-06-26T22:07:04+5:302023-06-26T22:31:27+5:30
पाच कोटी किंमतीच्या ई -सिगारेट, टॉयबॉल, ड्रोन तस्करी प्रकरणी
मधुकर ठाकूर
उरण : येथील जेएनपीए बंदरातुन पाच कोटींच्या ई-सिगारेट,टॉयबॉल,ड्रोन बेकायदेशीररित्या आयात केल्या प्रकरणी मुंबईच्या दोन व्यावसायिकांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.न्हावा-शेवा सीमाशुल्क विभागाच्या विशेष गुप्तचर शाखेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी जप्तीची कारवाई केली होती.
जेएनपीए बंदरातुन भारत सरकारने प्रतिबंध केलेल्या मालाची आयात करण्यात आली असल्याची गुप्त माहिती न्हावा-शेवा सीमाशुल्क विभागाच्या विशेष गुप्तचर शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.या माहितीच्या आधारावर तपास अधिकाऱ्यांनी एका संशयित कंटेनरची तपासणी केली.या कंटेनरमधुन
बेकायदेशीररित्या आयात करण्यात आलेल्या २०९२० ई-सिगारेट,५८५०० टॉयबॉल आणि लॅटेस्ट फुगे, १७९२ ड्रोन असा तस्करीच्या मार्गाने पाठविण्यात आलेला मालाचा साठा जप्त केला आहे.या जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत ५ कोटींच्या घरात असल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
या तस्करी प्रकरणी न्हावा-शेवा सीमाशुल्क विभागाच्या विशेष गुप्तचर शाखेच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील दोन व्यावसायिकांना अटक केली आहे.यापैकी एका व्यावसायिकाला ई-सिगारेट तस्करी प्रकरणी याआधीही पकडण्यात आले होते. न्यायालयाने दोघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.