बापरे! ८ वर्षात १४ वेळा गर्भपात, लिव्ह-इन पार्टनरच्या त्रासाला कंटाळून महिलेने दिला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 12:44 PM2022-07-15T12:44:28+5:302022-07-15T12:45:24+5:30
Suicide case : ही ३३ वर्षीय महिला गेल्या ८ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहत होती. ८ वर्षांत महिलेला १४ वेळा गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले. याला कंटाळून महिलेने ५ जुलै रोजी आत्महत्या केली.
राजधानी दिल्लीत एका महिलेने आपल्या लिव्ह इन पार्टनरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. लिव्ह इन पार्टनरवर महिलेचा १४ वेळा जबरदस्तीने गर्भपात केल्याचा आरोप आहे. आत्महत्येचे हे प्रकरण असून हे प्रकरण दक्षिण पूर्व दिल्लीतील जैतपूर भागातील आहे. ही ३३ वर्षीय महिला गेल्या ८ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहत होती. ८ वर्षांत महिलेला १४ वेळा गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले. याला कंटाळून महिलेने ५ जुलै रोजी आत्महत्या केली.
सुरुवातीला पोलीस याला आत्महत्या मानत होते. मात्र, त्यानंतर महिलेच्या कपड्यातून सुसाईड नोट सापडली. त्यानंतर आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि बलात्कार या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडित महिला दिल्लीतील जैतपूर भागात राहते. महिलेचे लग्न झाले होते आणि तिला दोन मुलीही आहेत, मात्र ९ वर्षांपासून ती महिला पतीपासून वेगळी राहत होती. महिलेने तिच्या दोन मुलींना वसतिगृहात शिकण्यासाठी पाठवले होते आणि सध्या ती स्वतः लिव्ह-इनमध्ये राहत होती.
या महिलेच्या आत्महत्येची माहिती पोलिसांना ५ जुलै रोजी मिळाली. महिलेने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर तपासादरम्यान पोलिसांना महिलेच्या कपड्यांमधून एक सुसाइड नोट मिळाली. सुसाईड नोटमध्ये महिलेने गेल्या ८ वर्षातील शोकांतिका लिहिली होती. बिहारमधील मधेपुरा येथील एका व्यक्तीला आत्महत्येसाठी जबाबदार धरण्यात आले होते. आरोपी नोएडातील एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करतो.
महिलेने लिहिले आहे की, गेल्या ८ वर्षांत ती १४ वेळा गरोदर राहिली. पण प्रत्येकवेळी तिला लिव्ह इन पार्टनरने गर्भपात करायला लावला गेला. महिलेने तिच्या सुसाईड नोटमध्ये आरोपीविरुद्ध पुरावे मोबाईलमध्ये ठेवत असल्याचे लिहिले आहे. पोलिसांनी मोबाईल सील केला असून तपासानंतर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात नसून त्याचा पोलीस शोध घेत आहे.