Crime : गुंतवणुकीवर नफा देण्याच्या नावाखाली १५ कोटींचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 07:03 AM2021-12-13T07:03:27+5:302021-12-13T07:03:50+5:30
फोर्टमधील प्रकार; पोलिसांत गुन्हा दाखल
मुंबई : मुंबई, राजकोटसह विविध ठिकाणी सुरू असलेल्या विकास प्रकल्पात गुंतवणुकीवर चांगला नफा देण्याच्या नावाखाली गुंतवणूकदारांची १५ कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार फोर्टमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालाडमधील रहिवासी असलेल्या ६० वर्षीय तक्रारदार हे एका एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. २००९ मध्ये त्यांची गोविंदभाई यांच्यामार्फत एका खासगी कंपनीचे अध्यक्ष जसाणी यांच्याशी ओळख झाली. यावेळी गोविंदभाई यांनी जसाणी यांच्या कंपनीचा एक विकास प्रकल्प सुरू असून त्यामध्ये गुंतवणूक केल्यास वार्षिक १५ ते २१ टक्के व्याज मिळणार असल्याचे सांगताच त्यांनी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.
यामध्ये त्यांच्यासह त्यांच्या नातेवाईक आणि मित्र परिवाराने जसाणी यांची भेट घेऊन प्रकल्पाबाबत माहिती घेतली. त्यांनाही जास्तीच्या व्याजाचे आमिष दाखवल्याने तक्रारदार यांनी १ कोटी ८० लाख रुपये गुंतवले. तर, अन्य २८ गुंतवणूकदार यांनी ५ कोटी २९ लाख रुपये अशी २००९ ते २०१३ या काळात एकूण ७ कोटी ९ लाखांची गुंतवणूक केली. जसाणी याने गुंतवणुकीबाबत प्रॉमिसरी नोट दिल्या. सुरुवातीला व्याजाची रक्कमदेखील दिली. मात्र काही दिवसाने पैसे देणे बंद केले. तक्रारदार यांनी पैसे परत देण्यासाठी तगादा लावला. यावेळी धनादेश देऊन काही दिवस ढकलले. मात्र खात्यात पैसे नसल्याने हे धनादेश वठले नाहीत. अखेर गुंतवणूकदारांनी न्यायालयात धाव घेतली हाेती.
न्यायालयात सुनावणी
न्यायालयात सुनावणी सुरू झाल्यानंतर जसाणी याने गुंतवणूकदारांची भेट घेऊन रक्कम व्याजासह परत करण्याचे आश्वासन दिले. मुद्दल आणि व्याज असे मिळून १३ कोटी १८ लाख रुपये परत करण्याचे त्याने कायदेशीर कबूल केले.
मात्र तरीही रक्कम न मिळाल्याने अखेर गुंतवणूकदारांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाणे गाठून एकूण १५ कोटींच्या आर्थिक फसवणुकीची तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत.