आमदाराच्या पत्नीकडे मागितले १५ कोटी रुपये, फेक कॉल करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 06:45 AM2023-11-06T06:45:47+5:302023-11-06T06:46:04+5:30
याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांना सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी तोतया अधिकाऱ्याने १५ कोटींची मागणी करणारा कॉल आल्याने खळबळ उडाली. भोसले यांच्या पत्नीला हा ईडी अधिकाऱ्याच्या नावाने कॉल आला. याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील शिवाजीराव भोसले को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्यासंबंधी राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अनिल भोसले हे सध्या ईडीच्या अटकेत आहेत. २५ फेब्रुवारी २०२० रोजी पुण्यातील शिवाजी भोसले को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्यासंबंधी पोलिसांनी अटक केली होती. भोसले हे शिवाजी भोसले को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष आणि संचालक होते.
ईडी अधिकाऱ्याची तक्रार
ईडीच्या मुंबई कार्यालयातील सहायक निदेशक सुनील कुमार (५६) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. आरोपीने ईडी अधिकारी असल्याची बतावणी करत रेश्मा भोसले यांच्याशी संपर्क साधला. भोसले यांना तुरुंगातून सोडविण्यासाठी १५ कोटींची मागणी केली. त्यानुसार भोसले यांच्या पत्नीने तत्काळ ईडी अधिकाऱ्यांना याबाबत सांगितले. कोणीतरी ईडी अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करत खोटा कॉल केल्याचे स्पष्ट होताच ईडी अधिकाऱ्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.