१५ लाख ६० हजारांची रोकड जप्त; तिघांना घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 05:19 PM2019-04-22T17:19:23+5:302019-04-22T17:21:15+5:30
उल्हासनगर - निवडणूक आचारसंहिता भरारी पथकाने वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये १५ लाख ६० हजार रुपयांची रोकड जप्त केली. याप्रकरणी तिघांना ...
उल्हासनगर - निवडणूक आचारसंहिता भरारी पथकाने वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये १५ लाख ६० हजार रुपयांची रोकड जप्त केली. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
उल्हासनगरात निवडणूक अधिकारी जगजितसिंग गिरासे व नोडल अधिकारी युवराज भदाणे यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने शनिवारी सायंकाळी सव्वासहा वाजता म्हारळगावनाका येथे एका कारमधून सहा लाख ५० हजारांची रोकड जप्त केली. यावेळी कारचालक अजबराट नाडर याला याबाबत विचारणा केली असता, त्याला रोख रकमेबाबत समाधानकारक उत्तरे देता आली नाही. त्यामुळे पथकप्रमुख संजय पवार यांनी उल्हासनगर पोलीस ठाणे गाठून साडेसहा लाखांच्या रोकडसह नाडर यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. शनिवारी मध्यरात्री कॅम्प नं.-३, साईबाबा मंदिर चौकात भरारी पथकाच्या झडतीत एका कारमधून पाच लाखांची रोकड मिळाली. याप्रकरणी रविराज सिंघानी यांना ताब्यात घेऊन भरारी पथकप्रमुख विजय बहेनवाल यांनी सिंघानी यांना मध्यवर्ती पोलिसांच्या ताब्यात दिले.रविवारी सकाळी साडेअकरा वाजता पुन्हा म्हारळनाका येथे एका कारच्या झडतीत चार लाख १० हजारांची रोकड मिळाली. या रोख रकमेबाबत राहुल आहुजा यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही.