सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे नाव सांगत दीड लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक
By राजकुमार जोंधळे | Published: October 6, 2023 08:14 AM2023-10-06T08:14:08+5:302023-10-06T08:14:56+5:30
फर्निचर देण्याचे दाखविले आमिष...
राजकुमार जाेंधळे
लातूर : सीआरपीएफमधील सेवानिवृत्त अधिकारी आहे. उच्च प्रतीचे फर्निचर विक्री करायचे आहे, असे म्हणून लातुरातील एका डाॅक्टरला १ लाख ४१ हजारांना गंडविल्याची घटना गुरुवारी घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिस निरीक्षक दिलीप सागर यांनी सांगितले, फिर्यादी डाॅ. अभय वसंतराव कदम (५२, रा. विश्वशरय्या काॅलनी, रिंग राेड, नाईक चाैक, लातूर) यांना संताेष कुमार आणि संदीप नावाच्या व्यक्तीच्या माेबाइल क्रमांकावरून फाेन केला. मी सीआरपीएफमधील सेवानिवृत्त अधिकारी आहे. माझ्याकडे उत्तम, उच्च प्रतीचे फर्निचर आहे. ते केवळ माफक दरात विक्री करायचे आहे, अशी बतावणी करून डाॅ. कदम यांना पैसे पाठविण्यास सांगितले. पैसे पाठविण्यासाठी फिर्यादीच्या व्हाॅटसॲपवर क्यूआर कोड पाठविला. त्यांच्या माेबाइलवरून ९१ हजार आणि त्यांचे मित्र आणि सूरज पोचापुरे यांच्या फाेन-पेवरून ५० हजार पाठविले. मात्र, फर्निचरचे साहित्य न देता विश्वासघात करून फिर्यादीची फसवणूक केली. ही घटना अंबाजाेगाई राेडवर बुधवार-गुरुवारदरम्यान घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.