मोगराळे घाटात दीड लाखांचा गांजा पकडला; गुन्हे शाखेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2021 10:32 PM2021-12-05T22:32:35+5:302021-12-05T22:32:50+5:30
घाटातून येणाऱ्या एका कारमधून उग्र वास येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी कारची तपासणी केली असता कारमध्ये गांजाची पोती सापडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : माण तालुक्यातील मोगराळे घाटात स`थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना पकडले. त्यांच्याकडून १ लाख ६१ हजारांचा गांजा आणि कार, मोबाइल असा सुमारे ९ लाख ८४ हजार ६८० रुपयांचा एेवज जप्त करण्यात आला आहे.
रणजित लक्ष्मण जाधव (वय २४), लक्ष्मण रामू जाधव (दोघेही रा. पिलीव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, गंभीर गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी हा माण तालुक्यातील मोगराळे घाटात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांना यांचे पथक तयार कारवाइसाठी पाठवले. दि. ४ रोजी सायंकाळी एलसीबीच्या पथकाने येणारी वाहने तपासण्यास सुरूवात केली.
त्यावेळी घाटातून येणाऱ्या एका कारमधून उग्र वास येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी कारची तपासणी केली असता कारमध्ये गांजाची पोती सापडली. रणजित आणि लक्ष्मण या दोघांना घेऊन पोलीस साताऱ्यात आले. यानंतर त्यांच्याकडे पोलिसांनी कसून चाैकशी केल्यानंतर त्यांनी गांजाची तस्करी करत असल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून ८ किलो ८४ ग्रॅम वजनाचा १ लाख ६१ हजार रुपये किमतीचा गांजा तसेच दोन मोबाइल आणि कार असा सुमारे ९ लाख ८४ हजार ६८० रुपयांचा एेवज जप्त करण्यात आला आहे. या दोघांवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाइ पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडीचे उप विभागीय पोलीस अधिकारी डाॅ. नीलेश देशमुख, हवालदार साबीर मुल्ला लक्ष्मण जगधणे, अर्जुन शिरतोडे, अमोल माने, वैभव सावंत, प्रवीण पवार आदींनी केली.