जिल्हा परिषदेत नोकरी लावण्याच्या नावावर १५ लाखांचा गंडा; एकाविरुद्ध गुन्हा दाखल
By संदीप वानखेडे | Published: August 20, 2023 05:25 PM2023-08-20T17:25:05+5:302023-08-20T17:25:13+5:30
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अरुण भास्करराव पाटील विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
बुलढाणा : शासकीय जाहिरात प्रसिद्ध होताच मध्यस्थ सक्रिय होतात. जिल्हा परिषदेत आरोग्य सेवक पदावर नियुक्ती करण्याचे आमिष दाखवून १५ लाखांचा एकाला गंडा घातला. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी कोलवड येथील एकाविरुद्ध १९ ऑगस्ट रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंदखेडराजा येथील लक्ष्मीकांत त्र्यंबकराव शिलवंत यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २०२२ मध्ये जिल्हा परिषदेत आरोग्य सेवक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अरुण भास्करराव पाटील (रा. कोलवड, ता. जि. बुलढाणा) याने त्यांच्याकडून १५ लाख रुपये घेतले. त्यानंतर नोकरीही लावून दिली नाही, तसेच पैसेही परत केले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच लक्ष्मीकांत शिलवंत यांनी बुलढाणा पोलिसात फिर्याद दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अरुण भास्करराव पाटील विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.