2660 बनावट कंपन्या तयार करून 15 हजार कोटींची GST द्वारे फसवणूक, 8 जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 11:26 PM2023-06-01T23:26:45+5:302023-06-01T23:27:09+5:30
आरोपींकडून 12.60 लाख रुपये, 2660 बनावट जीएसटी फर्मची कागदपत्रे, 32 मोबाईल आणि तीन कार जप्त करण्यात आल्या आहेत.
नोएडा पोलिसांनी 2.5 हजारांहून अधिक बनावट कंपन्या तयार करून 15 हजार कोटींहून अधिक फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. आरोपींनी पाच वर्षांत बनावट कंपन्या तयार करून जीएसटी रिफंड आयटीसी (इनपुट टॅक्स क्रेडिट) मिळवून सरकारची हजारो कोटींची फसवणूक केली. या टोळीतील एका महिलेसह आठ जणांना कोतवाली सेक्टर-20 पोलिसांनी अटक केली आहे. तर तीन सीएसह सात आरोपी फरार आहेत. दरम्यान, फसवणूक करणाऱ्यांकडे साडेसहा लाखांहून अधिक लोकांचे पॅनकार्ड, आधार कार्ड, वीज बिल आदींचा डेटा होता. आरोपींकडून 12.60 लाख रुपये, 2660 बनावट जीएसटी फर्मची कागदपत्रे, 32 मोबाईल आणि तीन कार जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस आयुक्त लक्ष्मी सिंह यांनी सांगितले की, कोतवाली सेक्टर-20 मध्ये बनावट पॅनकार्ड वापरून बनावट कंपनी तयार केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. टोळीचा म्होरक्या दीपक मुर्जानी, पत्नी विनिता, आकाश सैनी, विशाल, मोहम्मद यासीन शेख, राजीव (सीए), अतुल सेंगर आणि अश्वनी अशी दिल्लीतून अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर तीन सीएसह सात आरोपी फरार आहेत. या आरोपींनी दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी कार्यालये उघडली होती. फसवणूक करणारे आरोपी बनावट फर्म तयार करून जीएसटी क्रमांक मिळवायचे आणि बनावट बिले वापरून सरकारकडून जीएसटी रिफंड मिळवत होते.
पोलिस तपासात आतापर्यंत जवळपास 2660 बनावट कंपन्या उघड झाल्या आहेत. या कंपन्यांमध्ये चार ते पाच कोटींची बनावट बिले तयार करून जीएसटी रिफंड घेतला जात होता. या टोळीत पन्नासहून अधिक जणांचा सहभाग असल्याचे समोर आला आहे. तर यामध्ये 12 पेक्षा जास्त सीए सामील आहेत. पोलिस आणि जीएसटी अधिकाऱ्यांच्या प्राथमिक तपासात पाच वर्षांत 15 हजार कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी केंद्रीय जीएसटी, आयकर विभाग आणि इतर यंत्रणांना माहिती देण्यात आल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी नोएडा पोलिसांच्या पथकाने दिल्ली, पश्चिम बंगाल, चंदीगड येथे जाऊन चौकशी केली आणि अनेक राज्यांमध्ये छापे टाकले.
अशी करत होते फसवणूक
ही टोळी दोन प्रकारे फसवणूक करत होती. टोळीची पहिली टीम आधारकार्ड, पॅनकार्ड, वीजबिल आदी बनावट कागदपत्रांचा वापर करून बनावट कंपन्या तयार करत असे. त्यानंतर त्याचा जीएसटी क्रमांक घेतला जात होता. तर दुसरी टीम बनावट कंपन्यांच्या नावाने बनावट बिले बनवून जीएसटी रिफंड मिळवून सरकारची फसवणूक करत होती.