१५ लग्न, ३ कोटींची फसवणूक..., फक्त ५ वी शिकलेला व्यक्ती निघाला 'लखोबा लोखंडे'!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 09:22 AM2023-07-17T09:22:55+5:302023-07-17T09:35:03+5:30
या व्यक्तीने अन्य ९ महिलांशी लग्न करण्यासाठी बोलणे सुरू असल्याची माहिती समजताच, या प्रकरणाच्या तपासात गुंतलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना धक्काच बसला.
म्हैसूर : बंगळुरुमधील एका व्यक्तीने जवळपास १५ महिलांची फसवणूक केली आहे. म्हैसूर पोलिसांना वैवाहिक वेबसाइट्सवर महिलांची फसवणूक करणार्या प्रकरणाचा तपास करताना हा 'लखोबा लोखंडे'चा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आश्चर्याची बाब म्हणजे या व्यक्तीचे नाव महेश केबी नायक (३५ वर्षे) असून त्याने फक्त ५ वीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तसेच, या व्यक्तीने अन्य ९ महिलांशी लग्न करण्यासाठी बोलणे सुरू असल्याची माहिती समजताच, या प्रकरणाच्या तपासात गुंतलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना धक्काच बसला. या महिला त्याच्याशी लग्न करण्याचे ठरवत असल्याचे स्पष्ट झाले.
'इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, गेल्या १० वर्षांपासून महेश नायक वैवाहिक वेबसाइट्सवर महिलांना लग्नाचे आमिष दाखवण्यासाठी डॉक्टर किंवा इंजिनियर असल्याचे सांगत होता. गेल्या आठवड्यात एका सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांना त्याला पकडण्यात यश आले. या आरोपीने या वर्षाच्या सुरुवातीला या महिलेशी लग्न केले होते. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महेश नायक यांना तीन पत्नींपासून एकूण पाच मुले आहेत. तसेच, कथितरित्या त्याने किमान तीन महिलांची ३ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचेही म्हटले जाते.
महेश नायकविरुद्ध एफआयआर दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. बंगळुरूमध्ये राहणाऱ्या ४५ वर्षीय महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरने महेशविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, या दोघांची भेट २२ ऑगस्ट २०२२ रोजी एका वैवाहिक वेबसाइटद्वारे झाली होती. महेश नायकने स्वत:ला म्हैसूरमध्ये राहणारा ऑर्थोपेडिक सर्जन असल्याचा दावा केला आणि तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर २२ डिसेंबर २०२२ रोजी महेश नायक या महिलेला म्हैसूरला घेऊन आला. याठिकाणी एका भाड्याने घेतलेल्या घरात ते दोघे गेले. पण महेश नायकने महिलेला सांगितले की, ते घर स्वत:चे आहे.
क्लिनिक सुरू करण्यासाठी मागितले ७० लाख रुपये
एफआयआरमध्ये म्हटले आहे की, महेश नायकने तिला शहरात नवीन क्लिनिक सुरू करत असल्याचेही सांगितले. यानंतर या वर्षी २८ जानेवारीला विशाखापट्टणममधील एका आलिशान हॉटेलमध्ये त्यांचे लग्न झाले. ही महिला मूळची विशाखापट्टणममधील आहे. दुसऱ्या दिवशी तो म्हैसूरला परतला आणि ३० जानेवारीला महेश नायकने तिला तीन दिवस कामावर जावे लागेल असे सांगितले. त्यानंतर त्याने तिला क्लिनिक सुरू करण्यासाठी ७० लाख रुपयांचे कर्ज मागितले आणि महिलेने नकार दिल्यावर त्याने तिला धमकावले.
१५ लाखांची रोकड आणि सोने घेऊन फरार झाला होता
महेश नायकने ५ फेब्रुवारीला महिलेची १५ लाखांची रोकड आणि सोने लुटल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. यानतंर महेश नायकशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करूनही अपयश आले. पण तिला सर्वात मोठा धक्का बसला, जेव्हा दुसरी महिला महेश नायक आपला पती असल्याचा दावा करत घरात आली. त्यानंतर या महिलेने पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांना या प्रकरणाचा तपास करत अखेरीस महेश नायकला अटक केली. महेश नायकने दोन महिलांशी लग्न केल्याची तक्रार पोलिसांना मिळाली. त्यानंतर ९ जुलैला म्हैसूरच्या एका विशेष पथकाने महेश नायकला अटक केली.