कल्याणमध्ये नर्सिंग कोर्सच्या नावाखाली १५० तरुणींची फसवणूक!
By मुरलीधर भवार | Published: October 4, 2023 05:30 PM2023-10-04T17:30:19+5:302023-10-04T17:30:51+5:30
फसवणूक झालेल्या तरुणींनी कल्याण पूर्वेतील शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्याकडे दाद मागितली हाेती. त्यांनी या तरुणींना घेऊन पोलिस ठाण्यात धाव घेतली.
कल्याण- इंडियन नर्सिंग कौन्सिलचे प्रमाण पत्र मिळून देतो असे सांगून जवळपास १५० तरुणींकडून १ लाख ७५ हजार रुपये उकळणाऱ्या उड्डाण इन्स्टिट्यूट आ’फ एज्यूकेशनच्या विरोधात फसवणूक झालेल्या तरुणींनी महात्मा फुले पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. या इन्स्टीट्यूचा चालक वरुण झा याच्या विरोधात फसवणूकीची गुन्हा दाखल करण्याची तक्रार तरुणींनी दिली आहे. पोलिसांनी त्यांचा तक्रार अर्ज दाखल करुन या प्रकरणात पुढील चौकशी सुरु केली आहे.
फसवणूक झालेल्या तरुणींनी कल्याण पूर्वेतील शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्याकडे दाद मागितली हाेती. त्यांनी या तरुणींना घेऊन पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांशी या प्रकरणी चर्चा केली. फसवणूक करणाऱ्याच्या विरेाधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या संस्थेचे कार्यालय झुंझारराव संकुलात आहे. या संस्थेने कोर्सच्या नावाखाली प्रत्येक तरुणीकडून १ लाख ७५ हजार रुपये फी घेतली आहे. हा कोर्स ३ वर्षाचा होता. त्यांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्रावर इंडियन नर्सिंग कौन्सीलचा उल्लेखच नाही.
तसेच त्यावर विश्मकर्मा विद्यापीठाचा उल्लेख करण्यात आला आहे. तशा नावाचे विद्यापीठच अस्तित्वात नसल्याचे रिद्धी इंदूलकर या तरुणीने सांगितले. राबिया इंद्रीय या तरुणीने सांगितले की, आम्हाला देण्यात आलेल्या प्रमाणपत्रावर अ’डव्हान्स डिप्लोमा पेशंट केअर असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यावर इंडियन नर्सिंग कौन्सीलचा उल्लेखच नाही. आमच्याकडून फी वसूल करुन आमची फसवणूक केली आहे. दिलेल्या प्रमाणपत्रावर जो बार कोड दिला आहे. तो स्क’न केला तर त्याठिकाणी हा’लीवूडच्या हिरो हिरोईनचे फोटो आेपन होता.
या तरुणींनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे. हा तक्रार अर्ज पोलिसांनी दाखल करुन घेतला आहे. पोलिस या तक्रार अर्जाच्या आधारे चौकशी करणार आहेत. या प्रकणातील काही तरुणांची कोर्स पूर्ण झाला आहे तर काही तरुणांचा कोर्सचा कालावधी पूर्ण झालेला नाही. त्यामुळे आणखीन तरुणांची आर्थिक फसवणूक होऊ शकतो. तक्रारदार तरुणींनी सांगितले की, त्यांचे तीन वर्षात घेतलेले शिक्षण त्यांचे फसवणूक झाल्याने वाया गेले आहे. त्यांच्या भवितव्याचा प्रश्न या शैक्षणिक आणि आर्थिक फसवणूकीतून झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी योग्य ती कारवाई करुन कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.