विनयभंगाबाबत दोषारोपपत्र लवकर दाखल करण्यासाठी १५ हजारांची लाच, पोलिसाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 11:37 PM2021-10-23T23:37:14+5:302021-10-23T23:38:13+5:30
शनिवारी भास्कर चव्हाण याला १५ हजार रुपयांची लाच घेताना पोलीस वसाहतीमधील त्याच्या घरीच अटक करण्यात आली.
जळगाव : विनयभंगाबाबत दोषारोपपत्र लवकर दाखल करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना मारवड पोलीस ठाण्यातील हेकॉ. भास्कर नामदेव चव्हाण (५१) यास अमळनेर पोलीस वसाहतीमधील त्याच्या घरातच लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली.
पाडसे ता. अमळनेर येथील अरुण श्रावण गव्हाणे याने २२ जुलै २०२१ रोजी एका महिलेचा विनयभंग केला होता. यानंतर अरुण, त्याचे वडील श्रावण व भाऊ जीभाऊ यांनी यामहिलेस शिवीगाळ व दमदाटी केली होती. याबाबत मारवड पोलीस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल होता. यात आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश दिले होते. ही हजेरी माफ व्हावी, यासाठी गुन्ह्याचे चार्जशीट लवकर दाखल करावे यासाठी व गावबंदीच्या आदेशाबाबत सहकार्य करण्यासाठी चव्हाण याने आरोपींकडे १५ हजार रुपये मागितले होते.
शनिवारी भास्कर चव्हाण याला १५ हजार रुपयांची लाच घेताना पोलीस वसाहतीमधील त्याच्या घरीच अटक करण्यात आली.