दिग्दर्शक सिद्धार्थ जेना यांना १.५३ कोटीचा गंडा; १० जणांविरोधात बांगूर पोलिसांत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 07:58 AM2024-05-29T07:58:31+5:302024-05-29T07:58:56+5:30
गोव्यातील जमीन आणि फ्लॅट्समध्ये गुंतवणूक केल्यास फायदेशीर परतावा देण्याचे आश्वासन देत फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गोव्यातील जमीन आणि फ्लॅट्समध्ये गुंतवणूक केल्यास फायदेशीर परतावा देण्याचे आश्वासन देत चित्रपट दिग्दर्शक सिद्धार्थ जेना (५०, गोरेगाव पश्चिम) यांची १.५३ कोटी रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी १० आरोपींविरुद्ध बांगूर नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विक्रमदेव दर्शनराम मल्होत्रा, रितू विक्रमदेव मल्होत्रा, मारिया फर्नांडिस, राल्स्टन पिंटो, लीना मांद्रेकर, प्रमोद मांद्रेकर, लिओ डायस, रश्मी चोडणकर, ज्युडो सॅली गोम्स आणि साईनाथ पाटेकर, अशी आरोपींची नावे आहेत.
जेना यांची ओळख २०२० मध्ये विक्रमदेव मल्होत्रा याच्याशी एक विश्वसनीय रिअल इस्टेट एजंट म्हणून झाली. नोव्हेंबर २०२० मध्ये, ते मल्होत्रा याला भेटले. त्याने जेना यांना त्यांच्या वेबसाइटवर मालमत्ता दाखवल्या. जेनाने उत्तर गोव्यात ८४ लाखांचा प्लॉट निवडला आणि २५ हजार रुपये टोकन दिले. जेना यांनी नंतर जमीन मालकांना एकूण १० लाखांचे धनादेश दिले. मार्च २०२१ मध्ये, कोविड-१९ महामारीच्या काळात, मल्होत्रा याने जेना यांना जमिनीची किंमत तिप्पट होईल, असे आश्वासन देऊन आणखी भूखंड खरेदी करण्यासाठी तयार केले.
जेना यांनी बँक ट्रान्स्फर आणि रोखीने ४८.५९ लाख आणि मल्होत्राच्या बँक खात्यात ९१ लाख भरले. मात्र, दोन वर्षांपासून मल्होत्राने जेना यांच्या नावावर जमीन हस्तांतरित करण्यास विलंब केला आणि त्यांचे पैसेही परत करण्यास टाळाटाळ केली. मात्र, जुलै २०२३ मध्ये मल्होत्रा याने दिलेला चेक बाउन्स झाल्यावर जेना यांनी तक्रार दाखल केली. इतर आरोपींनी जमीन मालक असल्याचे भासवून मल्होत्रा यांना फसवणुकीत मदत केली. दरम्यान, जेना यांच्या तक्रारीआधारे बांगूरनगर पोलिसांनी २७ मे रोजी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.