पेमेंट गेटवे कंपनीचे खाते हॅक करून १६ हजार कोटींची उलाढाल, २५ कोटींची फसवणूक

By जितेंद्र कालेकर | Published: October 8, 2023 09:23 PM2023-10-08T21:23:22+5:302023-10-08T21:25:39+5:30

ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा

16 thousand crores turnover by hacking payment gateway company's account, fraud of 25 crores | पेमेंट गेटवे कंपनीचे खाते हॅक करून १६ हजार कोटींची उलाढाल, २५ कोटींची फसवणूक

पेमेंट गेटवे कंपनीचे खाते हॅक करून १६ हजार कोटींची उलाढाल, २५ कोटींची फसवणूक

googlenewsNext

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: सायबर गुन्हेगारांच्या एका टोळक्याने पेमेंट गेटवे सेवा पुरविणाैऱ्या कंपनीचे बँक खाते हॅक करून वेगवेगळ्या बँक खात्यांमधून तब्बल १६ हजार १८० कोटींची उलाढाल केली आहे. तर २५ कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने रविवारी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही फसवणूक बऱ्याच दिवसांपासून सुरु होती. परंतू, महाराष्ट्रातील ठाणे शहरातील श्रीनगर पोलिस ठाण्यात एक तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघड झाले. त्याच आधारे ठाणे सायबर विभागाने याप्रकरणी ६ ऑक्टाेंबर २०२३ रोजी नौपाडा पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

या तक्रारीनुसार एप्रिल २०२३ मध्ये कंपनीचे पेमेंट गेटवे खाते हॅक करून त्यातून २५ कोटी रुपये काढल्याचा आरोप आहे. याच तपासात १६ हजार १८० कोटींची उलाढाल झाल्याचेही उघड झाले आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. पंजाब उगले यांनीही या वृत्तास दुजोरा दिला आहे. दरम्यान, ठाणे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनंतर संजय सिंग, अमोल आंधळे, अमन, केदन, समीर दिघे, जितेंद्र पांडे आणि अन्य एका अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक), ४०९ (विश्वासाचा भंग) ४६७, ४६८ (बनावट), १२०बी (गुन्हेगारी कट) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींनुसार नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील आरोपी जितेंद्र पांडे याने यापूर्वी आठ ते दहा वर्षे बँकांमध्ये रिलेशनशिप आणि सेल्स मॅनेजर म्हणून काम केले आहे.

या प्रकरणात मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून या टोळीने भारतातील अनेक कंपन्या आणि लोकांना लक्ष्य केल्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

फसवणूकीची रक्कम २५ कोटींची

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार यातील दोन आरोपींनी रियल इंटरप्राईजेस या कंपनीच्या वाशीच्या आयडीएफसी या बँक खात्यावरून काही आर्थिक व्यवहार केले आहेत. त्यामुळे फसवणुकीची रक्कम २५ कोटींची असल्याचे आढळले आहे. त्याप्रमाणे वाशीतील कार्यालयात पोलिसांनी तपासणी केली असता, काही संशयास्पद दस्तऐवज मिळाले आहेत. त्यात विविध कंपनी भागीदारी करार पत्रे, चेक बुक, डेबिट कार्ड आदी आढळले. तपासात आरोपींनी ठाण्याच्या नौपाडा भागातील कार्यालयात पाच नोटराईस भागीदारी संस्था तसेच यासारख्या अनेक बनावट संस्था स्थापन करून शासनाची फसवणूक केली. या संस्थांमार्फत अनेक बँक खात्यावर १६ हजार कोटींपेक्षा अधिकचा व्यवहार केला असून यातील काही रक्कम यूएसबी मध्ये कन्वर्ट करून विदेशात वळती केल्याचे आढळल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे.

Web Title: 16 thousand crores turnover by hacking payment gateway company's account, fraud of 25 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.