बांधकामाच्या नावाखाली १७ लाखांची फसवणूक; व्यावसायिकावर गुन्हा
By संजय तिपाले | Published: August 20, 2023 05:33 PM2023-08-20T17:33:00+5:302023-08-20T17:34:40+5:30
गडचिरोलीतील घटना: न्यायालयाच्या आदेशावरुन फौजदारी कारवाई
गडचिरोली : बांधकाम करुन देण्याच्या नावाखाली साडेसतरा लाख रुपये उकळून नंतर बांधकाम अर्धवट बांधले व व्यवहाराप्रमाणे गाळे विक्री न करता फसवणूक केल्याच्या आरोपावरुन एका व्यावसायिकावर २० ऑगस्टला येथील ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
चंदशेखर मोतीराम भडांगे (रा.साईमंदिराजवळ संविधान चौक, गडचिरोली) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. ज्येष्ठ पत्रकार सुरेश कवडुजी पद्मशाली (रा.वाॅर्ड क्र.७, गडचिरोली) यांनी याबाबत न्यायालयात तक्रार केली होती, न्यायालयीन आदेशानुसार गुन्हा नोंद झाला. तक्रारीत पद्मशाली यांनी म्हटले आहे की, घराजवळ त्यांनी २५ वर्षांपूर्वी खरेदी केलेला दहा हजार चौरस फूट प्लॉट आहे. या प्लाॅटवर दुकानासाठी गाळे काढण्याचा सल्ला चंद्रशेखर भडांगे यांनी दिला व हे गाळे प्रत्येकी २० ते २५ लाख रूपये प्रमाणे विकून देतो अशी हमी दिली. त्यांच्यावर विश्वास ठेवून सुरूवातीला दोन गाळे बांधण्याचे ठरविले. हे दोन गाळे प्रत्येकी २० लाख रूपयांप्रमाणे मीचघेतो असे भडांगे म्हणाले. आणखी गाळे गाळे काढा ते विकून देतो, असे त्यांनी आश्वासन दिले. त्यामुळे पद्मशाली यांनी आयुष्याची सर्व जमापुंजी बांधकामासाठी भडांगे यांना दिली. एकूण १७ लाख ५३ हजार रूपये देऊन दोन गाळे बांधल्यावर ठरल्याप्रमाणे मला ४० लाख रूपये द्यावे, अशी मागणी पद्मशाली यांनी केली असता भडांगे यांनी हात वर केले. चालढकल करुन त्यांनी नंतर भेट घेणेही टाळले. व्हॉटसअप चॅटवरील आश्वासनही पाळले नाही.
पोलिसांकडून टाळाटाळ
अखेर सुरेश पद्मशाली यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली, पण पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यामुळे न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयात ॲड. सिध्दीक मन्सुरी यांनी पद्मशाली यांच्या वतीने बांजू मांडली, त्यानंतर प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हा नोंद झाला असून तपास उपनिरीक्षक गजानन तोटेवाड करत आहेत.