बँकेत जाताना वृद्ध महिलेची 17 लाखांची लूट, मुलगा आणि सून निघाले 'दरोडेखोर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 12:31 PM2022-02-02T12:31:16+5:302022-02-02T12:31:43+5:30
पैशाच्या हव्यासापोटी आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.
पाटणा: बिहारची राजधानी पाटणामधील मलसलमी पोलीस स्टेशन परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पैशाच्या हव्यासापोटी आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. 17 लाख रुपयांसाठी मुलाने आणि सूनेने कट रचल्याचे समोर आल्यामुळे पोलिसही हैराण झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलसलमी पोलीस स्टेशन हद्दीतील चुटकिया बाजार येथे राहणारी गिरिजा देवी ही वृद्ध महिला आपली सून शोभा राणी आणि तिच्या मुलीसोबत जमिनीच्या व्यवहारातून मिळालेले पैसे बँकेत जमा करण्यासाठी जात होती. यादरम्यान भैसानी टोला मोहल्ला परिसरात राहणाऱ्या तिच्या दुसऱ्या मुलाच्या घरासमोरुन जात असताना तीन दरोडेखोरांनी हवेत गोळीबार करत त्यांच्याकडून 17 लाख रुपये असलेली बॅग हिसकाऊन घेतली.
या घटनेनंतर आपल्या नशीबातच पैसे नसतील, असा विचार करुन गिराजा देवी यांनी तक्रार दाखल केली नाही. पण, पोलिसांनी स्वतः या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू केला आणि तिच्या मुलाचा कट समोर आला. मुलाने आणि सुनेने हे कृत्य केल्याचे कळताच गिरिजा देवी यांना मोठा धक्का बसला.
आरोपी सून-मुलगा अटकेत
पाटणा शहराचे डीएसपी अमित शरण यांनी जातीने या प्ररणात लक्ष घातले आणि प्रकरणाचा छडा लावला. पोलिसांच्या तपासात मुलगा आणि सूनेने इतर साथीदारांच्या मदतीने पैसे लुटल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपींना ताब्यात घेतले. पण, या प्रकरणातील आरोपी नातून अजून फरार असून त्याचा शोध सुरू आहे.