बापरे! १७ वर्षीय मुलगी मोबाईल चार्जला लावून बेडवर झोपली; सकाळी सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 03:39 PM2022-07-30T15:39:51+5:302022-07-30T15:40:13+5:30
अलीकडच्या काळात स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात असून तो जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे.
एक सतरा वर्षीय मुलगी तिचा मोबाईल चार्जिंगला लावून झोपी गेली. झोपेत मोबाईल तिच्या अंगाखाली होता. तेव्हा इलेक्ट्रिक शॉक लागल्यानं तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मुलीच्या मृत्यूनंतर फोन चार्जर्सच्या सुरक्षेवर सोशल मीडियात वादंग निर्माण झाले आहे. हे प्रकरण कंबोडिया येथील आहे. तेथील १७ वर्षीय खोर्न सेरे पोव(Khorn Srey Pov) तिच्या मोबाईलवर मृत अवस्थेत आढळली. ती एका गोल्ड माइनिंग कंपनीत काम करत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, खोर्न सेरे आंघोळ केल्यानंतर बेडवर झोपली होती. बेडवर तिने मोबाईल चार्जर प्लगमध्ये कनेक्ट करून ठेवला आणि फोन चार्ज करत होती. मोबाईलचा टॉर्च ऑन होता. चार्जिंगवेळी तिचा डोळा लागला आणि ती झोपून गेली. तेव्हा अचानक तिला विजेचा जोरदार शॉक लागला. या दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला.
२७ जुलैला विजेचा शॉक लागून मुलीचा झोपेत मृत्यू झाला होता. करंट लागण्यापूर्वी मुलीने आंघोळ केली होती. त्यानंतर बेडवर मोबाईल चार्जर प्लगला लावून ठेवला होता. त्या प्लगने ती मोबाईल चार्ज करू लागली. मात्र त्यानंतर ही घटना घडली. या घटनेची सोशल मीडियात बरीच चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर नेटिझन्स मोबाईल फोनच्या चार्जरबाबत टीका करत आहेत. त्यात काही वादही झाले आहेत.
अलीकडच्या काळात स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात असून तो जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. नवीन स्मार्टफोन खरेदी करतो तेव्हा त्यासोबत चार्जर मिळतो पण अनेकदा तो लवकर खराब झाल्याचा अनुभव काही लोकांना येतो. त्यामुळे पुन्हा नवीन घ्यावा लागतो. स्मार्टफोनचा वापर करताना अनेकांचे चार्जर हे लवकर खराब होते. हे चार्जर कितपत सुरक्षित आहेत सांगता येत नाही.
उत्तर प्रदेशात कुटुंब झालं होतं उद्ध्वस्त
काही महिन्यांपूर्वी अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये घडली होती. सहारनपूर जिल्ह्यात मोबाईल चार्ज करताना विजेचा धक्का लागल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. तर तिची दोन मुले होरपळली होती. अनेकदा रात्रीच्या वेळी लोक फोन चार्ज होत असतानाच वापरतात आणि झोपताना चार्जिंगवर ठेवतात, जेणे करून तो सकाळी पूर्णपणे चार्ज असावा. पण यामुळे मोठा अपघातही होण्याची शक्यता असते.