विक्रीकर अधिकाऱ्याकडून १७५ कोटीं ९३ लाखांचा गैरव्यवहार; एसीबीकडून गुन्हा दाखल
By मनीषा म्हात्रे | Published: March 1, 2024 05:21 PM2024-03-01T17:21:22+5:302024-03-01T17:54:33+5:30
१६ बोगस कंपन्यांना कर परतावा
मुंबई : विक्रीकर अधिकाऱ्यानेच पदाचा गैरवापर करत, बनावट कागदपत्रांद्वारे भासवलेल्या १६ कंपन्यांना १७५ कोटी ९३ लाख १२ हजार ६२२ रुपयांचा कर परतावा मंजूर करत शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चौकशीत समोर आला आहे. याप्रकरणी एसीबीने लाळगेसह १६ कर दात्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तत्कालीन वस्तू व सेवा विभागाचे अधिकारी तसेच विक्रीकर अधिकारी म्हणून कार्यरत अमित गिरीधर लाळगे (४४) यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. लाळगेकडे घाटकोपर विभाग नोडल ११ चा पदभार असताना, ऑगस्ट २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान ही फसवणूक झाली आहे. १६ करदात्यानी त्यांच्या व्यवसायाचे ठिकाणांचे बनावट व खोटे भाडेकरारपत्र सादर करून जीएसटीएन कमांक प्राप्त केले. त्यानंतर या करदात्यांनी शासनाला कोणताही कर भरला नसतानाही एकूण १७५ कोटी ९३ लाख १२ हजार ६२२ रुपयांच्या कर परताव्यासाठी ३९ करपरतावे अर्ज सादर केले होते.
लाळगेने या अर्जाबाबत कोणतीही शहानिशा केली नाही. तसेच हे करदाते बनावट असल्याचे जीएसटी पोर्टलवरील बीओ सिस्टीम मध्ये दिसत असतानाही अमित लाळगेने हे करपरतावे अर्ज मंजूर केले. १६ जणांशी संगनमताने स्वतःसह कर दात्यांच्या फायद्यासाठी अपात्र परतावा मंजुर करून १६ करदात्यांना एकूण १७५ कोटी ९३ लाख १२ हजार ६२२ रुपये वितरीत करून शासनाची फसवणूक केली. ही बाब समोर येताच, एसीबीने लाळगेसह १६ कर दात्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या कंपन्याबाबत अधिक तपास सुरु आहे.