लग्नाच्या वाढदिवस पार्टीत सापडले १८ बांगलादेशी घुसखोर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 09:16 AM2023-03-03T09:16:28+5:302023-03-03T09:16:48+5:30
गुन्हे शाखेची घणसोलीत कारवाई : रबाळे पोलिसांत गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : घणसोली गावातून १८ बांगलादेशींना अटक झाली असून त्यात १० महिला व ८ पुरुषांचा समावेश आहे. सर्व जण घणसोली व कोपरखैरणे परिसरात राहणारे असून सहकाऱ्याच्या लग्नाच्या वाढदिवस पार्टीसाठी बुधवारी रात्री ते एकत्र जमले असता त्यांना पकडण्यात आले. त्यांच्यावर रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
घणसोली गावातील म्हात्रे आळीमधील मौर्या अपार्टमेंटवर छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्याठिकाणी बांगलादेशी नागरिक एकत्रित जमणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक अतुल आहेर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथक स्थापन केले होते. त्यामध्ये उपनिरीक्षक शरद भरगुडे, सहायक निरीक्षक महेश शेट्ये, नीलम पवार, हवालदार अनिल मांडोळे, गोविंद गोसावी, महेंद्र ठाकूर आदींचा समावेश होता. त्यांनी बुधवारी रात्री ११ च्या सुमारास मौर्या अपार्टमेंटमधील एका घरावर धडक दिली. यामध्ये काही बांगलादेशी महिला व पुरुष हाती लागले. त्यानंतर दुसऱ्या घरातूनही काही बांगलादेशींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत ते मूळचे बांगलादेशचे असून वर्षभरापूर्वी घुसखोरी करून भारतात आल्याचे कबूल केले. तसेच मागील काही महिन्यांपासून ते घणसोली व कोपरखैरणे गावठाण परिसरात राहत होते. बुधवारी त्यांच्या एका सहकाऱ्याच्या लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी असल्याने तेथे ते एकत्र जमले होते. तेव्हा पाेलिस तेथे पाेहाेचले. त्यांनी तातडीने कारवाई केली.
घटनास्थळावरून पाेलिसांनी १८ बांगलादेशींना अटक केली असून त्यामध्ये १० महिला व ८ पुरुषांचा समावेश आहे. या सर्वांवर रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर त्यांच्या इतरही सहकाऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत.